‘भाऊ, बांधाल ते तोरण, ठरवाल ते धोरण’, ‘आम्ही सदैव आपल्या सोबत’ , नाथा भाऊंच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी..!

| जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला असून त्याकरिता एकनाथ खडसे यांचे होमग्राऊंड असलेल्या मुक्ताईनगरमधील कार्यकर्ते जोमाने तयारी लागले आहेत. भाजपचे कमळ चिन्ह एकनाथ खडसे यांची प्रतिमा असलेल्या पोस्टरवरुन गायब झाले आहे. त्याचबरोबर या बॅनरवर ‘भाऊ, बांधाल ते तोरण, ठरवाल ते धोरण’, ‘आम्ही सदैव आपल्या सोबत’ अशी वाक्य देखील पाहायला मिळत असल्यामुळे भाजपला शरद पवार यांनी दे धक्का दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे कोठेही जाणार नाहीत असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पण येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश होणार असे निश्चित मानले जात आहे.

भाजपमधील एकनाथ खडसे हे तगडे नाव, एकनाथ खडसे यांचे नाव पक्षात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर अग्रक्रमाने घेतले जात असे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ खडसे यांनाच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांचे नाव आयत्या वेळी पुढे आले आणि ते मुख्यमंत्रीही झाले. खडसे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री आणि क्रमांक दोनचे मंत्री होते. पण भोसरी येथील भूखंड प्रकरणाचे निमित्त झाले आणि खडसे यांचा बळी देण्यात आला. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे पक्षातून बाजूला पडत गेले ते गेलेच.

दरम्यान, घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसे हे प्रवेश करणार असे निश्चित मानले जात होते. तसे वृत्त प्रसारमाध्यमांतूनही झळकले होते. पण काही कारणास्तव हा मुहूर्त टळला. आता येत्या गुरुवारचा (22 ऑक्टोबर) मुहूर्त निश्चित मानला जात आहे. त्यामुळे खडसे यांच्या समर्थकांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.