भिगवणला सहाय्यक फौजदार महम्मदअली यासीन शेख यांचा वरिष्ठांकडून आगळा वेगळा निरोप समारंभ..

| इंदापूर / महादेव बंडगर | सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळत त्यांच्या आदेशानुसार काम करावे लागते… संपूर्ण आयुष्यभर वरिष्ठांच्या प्रत्येक कार्यक्रमात पुढे पुढे धावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याही आयुष्यात असे सुखद क्षण यावेत असं मनोमन वाटतचं…. परंतु तो योग सर्वांच्याच आयुष्यात येईलच असं नाही….. पण आयुष्यभर इमानेइतबारे सेवा केल्यानंतर किमान आपल्या सेवानिवृत्तीचा समारंभ तरी तेवढ्याच धुमधडाक्यात आपल्या सहकाऱ्यांकडून साजरा व्हावा ही प्रत्येकाची किमान अपेक्षा असते….. अपेक्षेनुसार काहींचा निरोप समारंभ तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो….तर काहींच्या नशिबी साधा नारळ आणि गुलाबाचं फुलंही येत नाही….परंतु भिगवण पोलिस स्टेशन मधील पोलीस वाहनावर चालक म्हणून काम करणारे सहाय्यक फौजदार महम्मद अली शेख हे नियत वयोमानानुसार 30 सप्टेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त होत होते… त्यांच्या निरोप समारंभाचा आगळावेगळा कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करून पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सर्वच अधिकाऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

ASI महम्मदअली यासीन शेख हे सन 1982 मध्ये पोलीस खात्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. त्यांनी एस आर पी गट नंबर 6 धुळे येथे 1982 ते 1986 पर्यंत सेवा दिली. त्यानंतर 1986 ते 2012 एस आर पी एफ गट नंबर 7 दौंड येथे सेवा बजावली. त्यानंतर सन 2015 पासून मुख्यालय येथे सेवा केली. शेवटी जून 2015 पासून भिगवण पोलिस स्टेशन येथे चालक म्हणून ते कर्तव्यावर होते. त्यांनी तब्बल 38 वर्षे 9 महिने शासकीय सेवा केली. त्यांचा सेवनिवृत्तीचा आगळावेगळा कार्यक्रम व्हावा या हेतूने जीवन माने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महम्मदअली यासीन शेख अतिशय मितभाषी, कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून सर्व परिचित होते. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा अपघात न करता, सेवा काळामध्ये कोणतीही शिक्षा न भोगता प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या सहकाऱ्यांपुढेही एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे याप्रसंगी बोलताना पोलीस सेवेतील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आपली सेवा पूर्ण करावी असे प्रतिपादन जीवन माने यांनी केले.

https://twitter.com/thelokshakti/status/1311561822256783360?s=19

यावेळी शासकीय वाहनांमध्ये महम्मद अली शेख यांना बसवून पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी हे वाहन स्वतः चालवले व आपल्या एका कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीच्या दरम्यान अनोखा सन्मान केला. या कार्यक्रम प्रसंगी शेख यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. याप्रसंगी अनेक पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच कर्मचाऱ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसले. वरिष्ठांकडून आपल्याच एका सहकाऱ्याचा आगळावेगळा निरोप समारंभ पाहून आनंदाची लकेर प्रत्येकाच्याच मनी उमटली असेल. प्रत्येकालाच क्षणभर का होईना आपल्याही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असाच अविस्मरणीय ठरावा असं मनोमन नक्कीच वाटलं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *