भिगवण पोलिसांकडून 15 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नागरिकांना विना खर्च परत..

| इंदापुर / महादेव बंडगर | पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष मोहीम राबवून दिनांक 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर यादरम्यान 15 लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे खात्री करून नागरिकांना परत करण्यात आला आहे. अशी माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

सदर मुद्देमालामध्ये एकूण सहा तोळे वजनाचे 3 लाख 12 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व गंठण कोर्टाच्या आदेशाने फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच इतर दोन गुन्ह्यातील 9 हजार पाचशे रुपये रोख रक्कम फिर्यादीस परत देण्यात आली आहे. तसेच एकूण सहा वाहने परत करण्यात आली आहेत.त्यापैकी 4 दोन चाकी वाहने व 2 चार चाकी वाहने यांचा समावेश आहे.त्यांची किंमत 11 लाख 18 हजार रुपये आहे. तसेच मोबाईल वगैरे इतरही मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला आहे. ही सर्व कामगिरी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक श्रीम.भारती खंडागळे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी फोनवरून व पोलीस पाटलांमार्फत संपर्क साधून यशस्वीरित्या पार पाडली आहे.

पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी अजून कोणाचा मुद्देमाल किंवा मोटारसायकल,चार चाकी वाहने पोलीस स्टेशनला असतील तर संबंधित नागरिकांनी योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख पटवून पोलीस स्टेशन येथून घेऊन जावीत. असे आवाहन नागरिकांना केले आहे. भिगवण पोलिसांच्यावतीने अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविल्याने नागरिकांना कोणताही त्रास न होता मुद्देमाल ताब्यात मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *