भिगवण-बारामती रस्त्याचा प्रवास ठरतोय जीवघेणा..ऊस वाहतुकीच्या वाहनांसाठी नियमावली आवश्यक..

| इंदापूर / महादेव बंडगर | सध्या नुकताच सुरू झालेला ऊसाचा गळीत हंगाम आता कुठे सुरळीत सुरू झालेला आहे. अजून सहकारी साखर कारखाने सर्वत्र झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने सुरूही नाहीत असे चित्र सगळीकडे असतानाच बारामती ऍग्रो या खाजगी साखर कारखान्याने मात्र ऊस गाळपात आघाडी घेतलेली आहे.त्यामुळेच की काय हंगामाच्या सुरुवातीलाच सर्वच वाहतुकदारांनी आपली ऊसवाहतुकीची वाहने याच कारखान्याला लावली. आणि भिगवण- बारामती रस्त्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनी ऊसाच्या “ट्रॅफिक जॅम” चाही लागलीच अनुभव घेतला.

आता कुठे ही वाहतूक सुरळीत चालू झाली असतानाच ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकांचे विविध कारनामे दिसून येऊ लागले आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र आपला जीवही गमवावा लागू शकतो याची या ट्रॅक्टर चालकांना कदाचित कल्पनाही येत नसेल. मदनवाडी घाटातून वर चढण चढत असताना ट्रॅक्टर चालकाला पूर्ण कसोटीने ट्रॅक्टर न्यावा लागतो. मात्र समोरून एखादे वाहन आल्यास किंवा समोर दुसरे वाहन चाललेलं असल्यास त्याला आपला वेग कमी करावा लागतो. नंतर पुन्हा दगडाची उटी लावूनच सर्कस मधील वाहनासारखा ट्रॅक्टर वर न्यावा लागतो.ट्रॅक्टर निघून जातो मात्र दगड तसाच रस्त्यावर पडून राहतो आणि तेच दगड इतरांसाठी जीवघेणे ठरू लागलेले आहेत.अनेक दुचाकी, चारचाकी वाहने यामुळे एकमेकांना घासतात आणि वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यातून एकमेकांना मारहाण होते. नाहक काहींना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनेकदा दगडाला घासून दुचाकीस्वार खाली पडतात. चारचाकी घासतात. त्यामुळे वाहनधारकांचेही नुकसान होते.

यामध्ये बऱ्याचदा ट्रॅक्टर चालक मालक स्थानिक परिसरातील असतात. त्यामुळे नुकसान होऊनही वरून सुजेपर्यत मार खाण्याचे भाग्यही बाहेरगावच्या अनेकांच्या नशिबी येते.हे सर्व टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने या ट्रॅक्टर चालकांनाही काही नियम घालून देणे गरजेचे बनलेले आहे.येथे कारखान्यांच्या वतीने एखादा मदतनीस नेमून हे दगड उचलणे, वाहतूक नियमन करणे शक्य आहे. तसेच ट्रॅक्टर चालकांचे मोठ्या कर्कश आवाजात लावलेले टेप प्रथम बंद करावे लागतील. कारण मागील ट्रेलर पडली तरी यांना याची कसलीच चाहूल लागत नाही. आजूबाजूचे ओरडून इशारे करून सांगतात. तेव्हा हे भानावर येतात. तोपर्यंत जवळपास 100 फूट ट्रेलर त्याने पडल्यानंतर ओढत नेलेली असते. ट्रेलर च्या पाठीमागे कोणतेही रिफ्लेक्टर नसतात किंवा लाल रेडियमही नसते. त्यामुळे थांबलेले ट्रॅक्टर अनेकदा लक्षात न आल्याने मोठमोठे अपघात होतात.त्यासाठी कारखान्याने हे बसवून दिले पाहिजेत. किंवा वजनकाट्यावर ट्रॅक्टर घेण्यापूर्वी या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत. नसतील तर दंड आकारला पाहिजे. आणि या सर्व गोष्टीवर प्रादेशिक परिवहन विभागाने जाणीवपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.तरच हे वाहतूकदार भानावर येतील.आणि सर्वसामान्यांना यातून सुटका मिळेल. अन्यथा चालू वर्षी ऊसाची अतिरिक्त उपलब्धता असल्याने अगदी मे महिन्यापर्यंत हा त्रास या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागेल. हे सर्व टाळण्यासाठी ऊसवाहतुकदार,साखर कारखाना प्रशासन व वाहतूक परिवहन विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *