भिगवण मधील सुदर्शन ट्रेडर्स या दुकानात चोरी;अज्ञात व्यक्तीने काउंटरशेजारी ठेवलेले 7 लाख रुपये केले लंपास..

| इंदापुर/ महादेव बंडगर | भिगवण येथील सुदर्शन ट्रेडर्स नावाच्या गोळ्या बिस्किटांची होलसेल विक्री करणाऱ्या दुकानाच्या काउंटरशेजारी ठेवलेल्या बॉक्समधील सात लाख रुपये रोख रकमेची कापडी पिशवी अज्ञाताने पाळत ठेवून लंपास केली आहे.याबाबत श्री. उत्तम विष्‍णू पन्हाळकर रा. भिगवन वार्ड क्र.4 तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांनी भिगवण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 4 नोव्हेंबर रोजी श्री .पन्हाळकर हे सकाळी 7.45 वाजता दुकान उघडण्यासाठी आलेले होते. दुकान उघडल्यानंतर त्यांनी आपल्याकडे असलेली रोख रकमेची कापडी पिशवी दुकानाच्या काउंटर शेजारी असलेल्या बॉक्सवर ठेवली व ते दुकानासमोर असलेल्या पानटपरीवर गेले होते. त्या ठिकाणी ते गप्पा मारत उभे असतानाच अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून पान टपरीच्या पाठीमागील बाजूने येऊन सदर पिशवी चोरुन काखोटीला मारली व तात्काळ तिथून पोबारा केला. याबाबतचे संपूर्ण चित्रण दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. भिगवण पोलिस अज्ञात चोराचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक फौजदार श्री. काळे हे करीत आहेत.भिगवण मध्ये सकाळच्या वेळी अशा पद्धतीने घडलेल्या चोरीने अनेकांना धक्का बसला आहे. व्यापाऱ्यांनी या घटने मधून बोध घेऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा भावना लोक व्यक्त करू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *