भिगवनच्या वाहतुकीला शिस्त लागणार केव्हा; वाहतुककोंडीने नागरिक हैराण.

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवन च्या वाहतुकीला शिस्त लागणार केव्हा? सर्वसामान्य नागरिकांमधून सध्या आवर्जून चर्चिला जाणारा एकमेव प्रश्न. भिगवनमध्ये धान्य बाजारामध्ये येणाऱ्या शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत असून भिगवण येथे दर रविवारी आठवडे बाजार असतो. भिगवन हे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून शेजारच्या दौंड,बारामती, कर्जत ,करमाळा या तालुक्यातील नागरिकही व्यापाराच्या निमित्ताने, खरेदी-विक्रीच्या निमित्ताने भिगवणला येत असतात. भिगवणला इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असून, शेळ्या मेंढ्याचा बाजारही आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून, शेजारील तालुक्यातून शेतकरी आपला शेतमाल,जनावरे घेऊन बाजारामध्ये येतात. परंतु दर रविवारी या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी पाहून शेतकरी वैतागून जात आहेत. यावर बाजार समिती, भिगवण ग्रामपंचायत किंवा भिगवन पोलीस स्टेशन यांच्या वतीने कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेन पेठेमध्ये प्रवेशद्वारावर पोलीस उभे असतात. परंतु बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर होणाऱ्या गर्दी बाबत कोणती दक्षता घेतली जात नाही.

बाजार समितीच्या प्रवेशद्वारा वर असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेल मुळे सकाळी नाश्त्यासाठी बाहेरगावावरून जाणारे अनेक नागरिक चार चाकी वाहने सर्व्हिस रोडवर लावतात. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहन आल्यास कोणालाच रस्ता पास करता येत नाही. त्यामुळे सदर रस्त्यावर दर रविवारी एकेरी वाहतूक करून बाजार समिती मध्ये प्रवेश करण्यासाठी मदनवाडी चौफुल्यावरून येणारी वाहने भिगवण ग्रामपंचायती समोरील रोडपास वरून वाहतूक फिरवून बाजार समिती मध्ये प्रवेश द्यायला हवा आणि परत जाणारी वाहने सर्विस रोड वरून मदनवाडी चौफुल्यावरून जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर सदर दिवशी सर्व्हिस रोडवर कोणत्याही प्रकारची इतर चार चाकी वाहने थांबवण्यास मनाई करणे गरजेचे आहे. या वाहतुकीच्या गैरसोयींमुळे अनेकदा वाहनचालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रसंग येतात, मारामारी होते, वाहने घासण्याचे प्रकार होतात हे सर्व नित्याचं असूनही पोलीस प्रशासन मात्र या बाबतीत खंबीर पावले उचलताना दिसत नाही. याबाबतीत योग्य त्या उपाययोजना केल्या तरच उपबाजारामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना आपली ट्रॅक्टर सारखी वाहने किंवा बैलगाडीने आपला शेतमाल उपबाजारापर्यंत पोहोचवणे शक्य होईल. या रोडवर संगम वाइन्स समोरील रस्त्यावरही चार चाकी वाहने पार्क केलेली असतात. त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी मनाई करणे गरजेचे आहे.पुढे गिरीजा गॅस एजन्सी समोर नेहमीचीच वाहतूककोंडी ठरलेली असते. यासाठी पोलिस प्रशासन ठोस उपाययोजना करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करील काय? हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना भेडसावतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.