भिगवन-बारामती रोडवरील धोकादायक ऊस वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, दै. लोकशक्ती च्या बातमीची घेतली दखल..!

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन-बारामती रोडवर होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीच्या विरोधात ‘दैनिक लोकशक्ती’ मध्ये सोमवारी (दि.2 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या बातमीनंतर भिगवण पोलिस प्रशासनाच्या वतीने तातडीने सकारात्मक पावले उचलण्यात आली असून आजच पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी तातडीने बारामती ॲग्रो साखर कारखाना शेटफळगडे येथील कारखाना प्रशासन आणि ऊसवाहतुकदार यांची बैठक घडवून आणून सुरक्षित ऊस वाहतुकीच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. याबाबत प्रशासनास काही सूचना दिल्या. तसेच ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले. आपल्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन कोणाचेही कुटुंब उघड्यावर येणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या मालाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. व आपणही सुरक्षित राहा. अशा सूचनाही वाहनचालकांना देण्यात आल्या.

या बैठकीनंतर कारखाना कार्यस्थळावर आलेल्या ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर आणि लाल कापड लावण्यात आले. ट्रॅक्टर चालकांनी इथून पुढे ट्रॅक्टर चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच ऊसाच्या फडातून बाहेर निघताना ट्रेलरच्या पाठीमागील बाजूस लाल कापड लावलेले आहे की नाही हे पाहूनच ऊसाच्या फडातून ट्रॅक्टर बाहेर काढावा. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीने धोकादायक ऊस वाहतूक करताना अशी वाहने आढळल्यास संबंधित ट्रॅक्टर चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.असा इशाराही बैठकीदरम्यान जीवन माने यांनी दिला आहे.या बैठकीसाठी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे व कारखाना प्रशासनाचे अधिकारी व वाहतूकदार उपस्थित होते.

धोकादायक पद्धतीने होत असलेल्या ऊस वाहतुकीमुळे निर्माण होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. पोलीस प्रशासनाने याच पद्धतीने निर्माण होणाऱ्या समस्येवर तातडीने उपाययोजना केल्यास अनेक समस्या तात्काळ मार्गी लागण्यासाठी मदत होईल. अशा प्रतिक्रिया नागरिक उत्स्फूर्तपणे व्यक्त करू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *