भाजप कार्यकर्त्यांनीच केला विरोधी पक्षनेत्यांचा निषेध..!

| सांगली | अतिवृष्टीमुळे सगळीकडे सारखेच नुकसान झाले आहे. तुमच्या गावात काय वेगळे असणार ? त्यामुळे ते काय बघायचे, असे वक्तव्य करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी टाळणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी निषेध केला.

सांगली जिह्यातील कवठेएकंद परिसरात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात नुकसानग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यावर असणारे प्रवीण दरेकर बुधवारी कवठेएकंद येथे पाहणीस येणार होते. मात्र , नुकसानग्रस्तांना न भेटताच ते निघून गेले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार गोपीचंद पडळकर येणार म्हणून येथील भाजप कार्यकर्त्यांनी ओढा पात्रातील स्वच्छता, नुकसानग्रस्तांना अन्नधान्यवाटप, असे नियोजन केले होते. मात्र, दरेकर यांनी नुकसानग्रस्तांच्या भेटीला जाणे टाळले.

दुपारी साडेबारा वाजता दरेकर कवठेएकंदला येणार होते; मात्र पाच तास उशिरा आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती केली. मात्र, अतिवृष्टीने सर्वत्र सारखेच नुकसान झाले आहे, येथे काय वेगळे असणार, असे सांगत सांगलीला बैठक असल्याचे सांगून ते निघून गेले.

दरेकर यांच्या दुजाभावाने येथील भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब शिरोटे, दीपक घोरपडे, जयवंत माळी, दीपक जाधव, बाळासाहेब पवार, आनंदराव काळे, गुंडा मेनगुधले, राहुल शिरोटे, महादेव काळे यांनी निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *