भाजपा मधील ओबीसी नेते चूप का आहेत?

सद्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देश पातळीवर गाजतो आहे. महाराष्ट्रामध्ये तर तो आणखीच गुंतागुंतीचा झालेला आहे. त्यातच भाजपचे खासदार उदयन भोसले यांनी मराठ्यांना आरक्षण देत नसाल, तर सर्वांचे आरक्षण बंद करा, अशी महान भूमिका मांडली आहे. तो त्यांचा अधिकार आहे ! पण ही गोष्ट त्यांच्या पक्षाला मात्र मनापासून आवडली असणार !

या पार्श्वभूमीवर भाजपा मधील तथाकथित ओबीसी नेते, भोसले यांचे स्वागत करणार आहेत, की निषेध करणार आहेत ? त्यांच्या तोंडातून अजुन तरी निषेधाचा आवाज आलेला दिसत नाही. जसा त्यांचा पक्ष आरक्षण विरोधी आहे, तसेच हे भाजपा मधील तथाकथित ओबीसी नेतेही आरक्षण विरोधी आहेत का? हे भाजपा मधील ओबीसी सेल वाल्यांनी, ओबीसी लोकांनी समजून घ्यायला हवे !

भोसले यांच्या विधानाची दुसरी बाजूही भयंकर आहे ! ती म्हणजे, मराठ्यांना आरक्षण देणार नसाल, तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ही भूमिका सर्व मराठा नेत्यांची भूमिका मानायची का ? त्यांनाही आरक्षण पूर्णपणे रद्द व्हावे असेच वाटते का ? म्हणजे त्यांचाही मनातून भोसले यांना पाठिंबा आहे ? नसेल तर त्यांनी भोसले यांच्या या विधानाचा निषेध केला का ? खा. भोसले यांचे हे विधान अगदीच दुर्लक्ष करायला हवे, इतके फालतू आहे का ?

आणि जर हे लोक निषेध करणार नसतील, तर मग मराठा आरक्षणाचे समर्थन करणारे ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी नेते आहेत, त्यांनी आपल्या भूमिकेबाबत फेरविचार करायला हवा, अशी चिथावणी देणारे नाही का ? की महाराष्ट्रातील ओबीसी, मागासवर्गीय समाज आपला गुलाम आहे, वेठबिगार आहे, अशी या लोकांची समजूत झाली आहे ?

महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरांची पुरोगामी परंपरा आणि संतांची समतावादी विचारधारा तशीच कायम रहावी, असे वाटणाऱ्या सर्वांनी या गोष्टीचा विचार करायला हवा, काळजी घ्यायला हवी, असे मला वाटते. बघू या, कोण कोण निषेध करतात ते !

या निमित्ताने अनेकांचे खरे चेहरे तरी समोर येतील !
..निदान तेवढ्यासाठी तरी खासदार भोसले यांचे अभिनंदन करायला मला आवडेल !

तूर्तास एवढंच !

– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान
•••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *