भयंकर : मॉस्कोत प्रमुख विरोधी पक्षनेत्यावर विषप्रयोग, कोमात गेल्याची माहिती..!

| मॉस्को | रशियातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून रशियातील विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक एलेक्सी नवलनी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान प्रवासारदम्यान एलेक्सी यांच्यावर चहामधून विषप्रयोग करण्यात आला आहे. एलेक्सी सायबेरियावरुन मॉस्कोला परत येत असतानाच विमानामध्ये त्यांना उटल्या आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागला. ‘असोसिएट प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार एलेक्सी यांची प्रकृती बिघडल्याने विमानाला इमर्जन्सी लॅण्डींग करावं लागलं. एलेक्सी कोमात गेल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

एलेक्सी यांचे प्रवक्त्या कीरा यारम्यश यांनी ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. एलेक्सी यांचा जीव धोक्यात असल्याचे कीरा यांनी म्हटलं आहे. एलेक्सी यांच्यावर विष प्रयोग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते कोमामध्ये गेले आहेत असंही कीरा यांनी ट्विट केलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गरम चहामधून विष देण्यात आल्याने ते वेगाने शरीरामध्ये पसरल्याची शक्यता आहे. पोलिसांची एक तुकडीही रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. कीरा यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्विटमध्ये “एलेक्सी यांना खूपच घातक विष देण्यात आलं आहे. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत,” अशी माहिती दिली आहे.

एलेक्सी यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते रोज सकाळी गरम चहा पितात. याच चहामध्ये विष मिसळण्यात आलं. विमानामध्येच एलेक्सी उटल्या करु लागले. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून मॉस्कोऐवजी विमान ओमस्कला उतरवण्यात आलं.

रशियामधील वृत्तसंस्था असणाऱ्या टासने (टीएएसएस) ओमस्क इमर्जन्सी हॉस्पीटलमधील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये एलेक्सी यांच्या विषप्रयोग झाला आहे की नाही यासंदर्भात अद्याप स्पष्टपणे कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचं म्हटलं आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एलेक्सी यांना स्ट्रेचरवरुन रुग्णालयामध्ये दाखल करतानाची दृष्य दिसत आहे.

एलेक्सी यांनी रशियामधील भ्रष्टाचारा विरोधामध्ये लढण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली होती. मात्र मागील महिन्यामध्ये एका बड्या व्यवसायिकाने दाखल केलेल्या खटल्यानंतर हे फाउंडेशन बंद करण्यात आलं. २०१८ साली एलेक्सी हे पुतिन यांच्याविरोधात निवडणूक लढवणार होते मात्र त्यांना निवडणूक लढवता आली नाही. ते रशियामधील सरकारला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

अनेक वर्षांपासून एलेक्सी हे रशियामधील अगदी स्थानिक निवडणुकांपासून मोठ्या निवडणुकांपर्यंत सर्व ठिकाणी सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाच्या उमेदवारांविरोधात उभ्या असणाऱ्यांना मदत करत आहेत. रशियामध्ये सरकारला विरोध करणाऱ्या इतर नेत्यांप्रमाणे एलेक्सी यांनाही अनेकदा अटक कऱण्यात आली होती. २०१७ साली एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या चेहऱ्यावर अॅण्टीसेप्टीक फेकलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *