मग जगातील सर्वात मोठा पक्ष करतोय काय…? अण्णांचा भाजपला खडा सवाल..!

| राळेगण सिद्धी | दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी दिल्लीत बोलावणाऱ्या भाजपला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी अतिशय कठोर शब्दात खडसावले आहे. कुठल्याही आंदोलनासाठी आता दिल्लीत येणार नाही. त्यातच सर्वाधिक युवा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपने माझ्यासारख्या ८३ वर्षांच्या वृद्धाला आंदोलनासाठी बोलावणे हे दुर्दैवच आहे असा टोला अण्णांनी लगावला. उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी हे पत्र पाठवले होते. मुळात ते पत्रच आपल्याला मिळालेले नाही असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

भाजपने २०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवले होते:

दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी पत्र पाठवल्याची माहिती केवळ माध्यमांकडूनच कळाली. मला हे पत्र अद्याप मिळालेले नाही. अण्णा हजारेंनी सांगितल्याप्रमाणे, २०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचा पक्ष सत्तेत आला. पण, जनतेच्या समस्या काही कमी झालेल्या नाहीत. कोणताही पक्ष सत्तेत असला तरी व्यवस्ता बदलल्याशिवाय परिवर्तन होत नाही. त्यामुळे, मी दिल्लीत येऊन काहीच फरक पडणार नाही.

मग केंद्र दिल्ली सरकारवर कारवाई का करत नाही :

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच भ्रष्टाचार विरोधात बोलतात. भ्रष्टाचार विरोधात सरकारने ठोस पावले उचलली असा दावा केला जातो. पण, दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार भ्रष्टाचार करत आहे हे अशी परिस्थिती असेल तर मग केंद्र सरकारनेच कारवाई का केली नाही. याचा अर्थ केंद्र सरकारने भ्रष्टाचार विरोधात केलेले सर्व दावे निरर्थक आहेत का? सीबीआय आणि दिल्ली पोलिसांवर सुद्धा तुमचेच नियंत्रण आहे अशी आठवण अण्णांनी करून दिली.

पक्ष पाहून आंदोलन केले नव्हते :

मी फकीर माणून आहे. मंदिरातील १०×१२ फुटांच्या खोलीत राहतो. मी कधीही पक्ष पाहून आंदोलन केलेले नाही. मला कुठल्याही पक्षाशी काहीच देणेघेणे नाही. केवळ गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी आंदोलन करत आलो आहे असेही अण्णा हजारेंनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *