माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्र निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरु झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत, यामध्ये कोरोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची पोस्ट कोविड स्थिती याबाबत माहिती घेत आहेत. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेत आहेत.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोनाविषयक आढावा घेतला.

अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळवणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्याप्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कोकण :10 लाख 63 हजार 163 कुटुंबांची पाहणी

कोकण विभागात 1 कोटी 92 लाख 72 हजार 065 लोकसंख्या असून, 48 लाख 66 हजार 372 कुटुंब संख्या आहे. यासाठी 7 हजार 425 पथकांची आवश्यता आहे. त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आलेलीआहेत. दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत.आजअखेर ही संख्या 10 लाख 64 हजार 143 एवढी होते. भेटीदरम्यान 1 हजार 403 तापाचे रुग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृष्य आढळून आले आहेत. कोकण विभागात 6 हजार 780 ऑक्सिमिटर आवश्यक आहे. त्यापैकी 6 हजार 420 ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. 6 हजार 666 थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे. त्यापैकी 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबात मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात 55 हजार 268 आरोग्यपथके तैनात करण्यात आली असून, कालअखेर 70.75 लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे. यात 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे. 37 हजार 733 संशयितांपैकी 4 हजार 517 कोविड रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली.

हे सर्वेक्षण समाजातील सर्वांसाठी- आदिती तटकरे

राज्यमंत्री, कु. अदिती तटकरे म्हणाल्या, बरे झालेले रुग्ण आणि त्यांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करावी. जनजागृती प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर द्यावा. सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. ही भावना सर्वत्र असावी.

मोहिमेत व्यापक जनसहभाग

कोकण विभागात या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत फ्लेक्स, बॅनर, वृत्तपत्र प्रसिध्दी आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजना यामुळे रुग्ण दुप्पटीचा वेग 55 दिवसांवर आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विभागात ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ मोहिमेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत.

त्यात पालघर जिल्हयात वारली पेंटिंग आणि वारली भाषेमध्ये प्रसिध्दी, सिंधुदूर्ग मध्ये दशावताराच्या माध्यमातून प्रसिध्दी, रत्नागिरी जिल्हयात गुडी महोत्सव आणि महापालिकेअंतर्गत 40 जाहिरात फलके, 5 कमाने, 100 बसस्टॉप आणि 75 बसेसवर प्रसिध्दी करण्यात आली आहे.

रायगड जिल्हयात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदा, कल्याण डोंबिवली महापालिकाअंतर्गत ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कोकण विभागाच्या बैठकीसाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पालक सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा कोरोना टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे विभाग

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्‍याचे आवाहन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्‍यांनी पुणे महसूल विभागातील पाच जिल्‍ह्यांशी दृकश्राव्‍यप्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री दत्‍तात्रय भरणे, कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्‍य मंत्री सतेज पाटील यांच्‍यासह पालकसचिव तसेच जिल्‍हाधिकारी सहभागी झाले होते.

मोहिमेच्या यशासाठी जनतेचा सहभाग आवश्यक

यावेळी मुख्‍यमंत्री श्री.ठाकरे म्‍हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्‍यासाठी आपल्‍याला एका निश्चित मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी त्‍यामध्‍ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा. कोरोनावरील लस उपलब्‍ध होईल तेव्‍हा होईल, तथापि, आज आपण उपचार पध्‍दती, जनजागृती याद्वारे या संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्‍क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्‍ट अंतर पाळणे यावरही आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. समाजामध्‍ये दोन प्रकारचे लोकं दिसत आहेत. मनात प्रचंड भीती असलेले आणि दुसरे बेपर्वाईने वागणारे की जे मास्‍क वापरत नाहीत, सोशल-फिजिकल डीस्‍टंस पाळत नाहीत. कोरोना पॉझिटीव्‍ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याचा धोका असतो. त्‍यांच्‍या माध्‍यमातून होणारा संसर्ग कोणासाठी तरी घातक ठरु शकतो, असेही ते म्‍हणाले.

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करा, बाजारात गर्दी करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले.

रेमेडिसिव्‍हीर तसेच इतर औषधांच्‍या वापराबाबत डॉक्‍टरांनाच ठरवू द्या. अनेकदा रुग्णाचे नातेवाईक उपचाराबाबत आग्रही असतात. आक्रमक ट्रीटमेंटमुळे दुष्‍परिणाम होवू शकतात, असेही ते म्‍हणाले.

कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांची काळजी घ्या- उपमुख्यमंत्री

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी यापुढील काळात कोरोनामुळे बरे झालेल्‍या रुग्णांना काही त्रास होत नाहीना, याची माहिती घेवून पोस्‍ट कोवीड सेंटर सुरु करावे लागण्‍याची शक्‍यता असल्याचे म्हटले आहे. काहींना कोरोनाची लक्षणे नसली तरी त्रास होत आहे. त्‍यामुळे मोहिमेच्‍या दुस-या टप्‍प्‍यात पोस्‍ट कोवीड सेंटरबाबत निर्णय घेता येईल.

पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची यशस्‍वी अंमलबजावणी होत असल्‍याचे सांगितले. सर्व तालुक्‍यांना भेटी देण्‍यात आल्‍या असून पहिल्‍या टप्‍प्यात आजपर्यंत 182 गावांचे आणि 13 नगरपालिकांचे सर्वेक्षण पूर्ण केल्‍याचे सांगितले. सर्वेक्षणासाठी 2300 पेक्षा जास्‍त पथके नेमण्‍यात आली तसेच त्‍यांचे प्रशिक्षणही घेण्‍यात आले. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुकत सौरभ राव यांच्‍या उपयुक्‍त सूचनांमुळे ही मोहिम यशस्‍वी होत आहे. पुणे जिल्‍ह्यात उद्योग, कारखाने मोठ्या संख्‍येने आहेत. त्‍यामुळे ‘माझी फॅक्‍टरी, माझी जबाबदारी’, ‘माझी हौसिंग सोसायटी, माझी जबाबदारी’ ‘माझा वॉर्ड, माझी जबाबदारी’ अशा पध्‍दतीने लोकसहभाग घेण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *