माढा जिल्हा परिषद शाळा क्र. १ होणार “आदर्श शाळा”, राज्य शासनाच्या “आदर्श शाळा” योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहा शाळांची निवड..!

| सोलापूर / महेश देशमुख (माढा) | व्यवस्थापन समितीचा पुढाकार… गावाचे सहकार्य….आणि शिक्षकांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावर माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक या शाळेची राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या योजनेत निवड झाली आहे.

मार्च २०२० मध्ये पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षण विभागाने राज्यातील तीनशे जिल्हा परिषद शाळा माॅडेल स्कूल अर्थात आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यामधील ठरवलेल्या निकषांच्या आधारावर पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ज्या शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत वर्गखोल्या, क्रीडांगण, सायन्स लॅब, दळणवळणासाठी साधने,भविष्यात विद्यार्थी संख्या वाढल्यास इमारत वाढविण्यासाठी पुरेशी जागा, व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता याचा समावेश करत एकविसाव्या शतकातील नवनिर्मितीला चालना देणारे समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मूल्ये अंगी वाढविणे, सोबत काम करण्याचे कौशल्य, संभाषण कौशल्य यासारखी अन्य कौशल्ये जाणीवपूर्वक विकसित करण्यात येणार आहेत.

या शाळांमध्ये मुलांचा शारीरीक, बौद्धिक व मानसिक विकास करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन व अन्य विषयांमध्ये प्राविण्य मिळवून देण्यासाठी या शाळा विकसित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने पहिल्या टप्प्यात तीनशे शाळांची निवड केली असून सोलापूर जिल्ह्यातील सातदुधनी (अक्कलकोट), बीबी दारफळ( उत्तर सोलापूर), आष्टी (मोहोळ), ढवळस (मंगळवेढा), मांजरी (सांगोला), बोचरे वस्ती करकंब (पंढरपूर), आदर्श प्रि महाळुंग (माळशिरस ), माढा शाळा क्रमांक एक (माढा), मानेगाव (बार्शी), वाशिंबे (करमाळा) या शाळांची निवड करण्यात आलेली आहे. माढा तालुक्यातून माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांकएक ची निवड झाल्याने या शाळेतील शिक्षक, पालक व गावकऱ्यांनी या निवडीचे स्वागत व आनंदोत्सव साजरा केला आहे.पंधरा लाखांची  सर्वाधिक लोकवर्गणी करून शाळेने आयएसओ मानांकन प्राप्त केले असून जिल्हा परिषदेचा आदर्श व्यवस्थापन समिती पुरस्कार, आचार्य दोंदे आदर्श शाळा पुरस्कारांसह शाळा तालुक्यात प्रगतीपथावर असताना शासनाच्या निवड प्रक्रियेत शाळा आल्याने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व शिक्षक व पालकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.  

✓ ” शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या उत्कृष्ट कामामुळे, प्रशासनाच्या समन्वयामुळे व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक व पालकांच्या सहकार्यामुळे शाळा आदर्श ठरली आहे याचा अभिमान वाटतो. ”
– मारूती फडके, गटशिक्षणाधिकारी 

✓ ” आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या योजनेत निवड आमच्या शाळेची निवड झाल्याने आजपर्यंत शाळेने दिलेल्या गुणवत्तेचे चीज झाल्याचे समाधान झाले आहे. शिष्यवृत्ती, टॅलेंट हंट, नवोदय व इतर स्पर्धा परिक्षेत या शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यापुढेही ही शाळा गुणवत्तेत येणार यात शंका नाही. “
– मुख्याध्यापक ,मालती तळेकर 

✓ ” या शाळेच्या विकासासाठी गेल्या  सहा वर्षात पंधरा लाखांची लोकवर्गणी माढा शहरातील अधिकारी, व्यापारी, विविध संघटना, रोटरी क्लब व विकास क्लबच्या माध्यमातून गोळा झाली. पिण्याच्या पाण्यासाठी बोअर, फिल्टर, संगणक, स्मार्ट टी.व्ही, रंगरंगोटी, प्रोजेक्टर, सायन्स लॅब,वृक्षारोपण  अशी कामे झाली. आणि शाळा शासनाच्या आदर्श शाळा योजनेसाठी  निवड झाली यामुळे मनस्वी आनंद होत आहे.”
– धैर्यशील भांगे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *