मंत्री व खासदार शिंदे या संवेदनशील पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आरोग्य चळवळ सर्व लोकप्रतिनिधींसाठी आदर्श – खासदार छत्रपती संभाजी राजे

| ठाणे | कोल्हापूर शहरातील कोविडग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून १ सुसज्ज रुग्णवाहिका छत्रपती संभाजीराजे फौंडेशनला हस्तांतरित करण्यात आली. येत्या गुरुवारी कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीत कोल्हापूर येथील कोरोनाचा वाढता प्रभाव आणि त्यासंदर्भातील उपाययोजना यांवर विस्तृत चर्चा करून कोल्हापूरसाठी अनेकविविध मागण्या केल्या होत्या. यात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोल्हापूर शहरासाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची मागणी केली होती. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका आठवड्याच्या आत डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे आपल्याला एक सुसज्ज रुग्णवाहिका देतो असा शब्द दिला होता. आज एका आठवड्याच्या आत दिलेला शब्द पूर्ण करत खासदार डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजीराजे फौंडेशनला एक सुसज्ज रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आली.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांस रुग्णवाहिकेची चावी आणि कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे , छत्रपती संभाजीराजे यांचे सचिव योगेश केदार आदीजण उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट :

यावेळी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ठाणे येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. सध्या या कक्षाचे २४*७ कोविड वॉर रूम मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यात डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्यने काम करणाऱ्या सर्व १५ वैद्यकीय सहाय्यकांच्या कामाचे स्वरूप छत्रपती संभाजीराजे यांनी जाणून घेतले. कोरोनाच्या संकटकाळात अखंड सेवा देणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील सर्व सहकाऱ्यांना यावेळी छत्रपतीनी शुभेच्छा दिल्या. मंगेश चिवटे व टीम चांगले काम करत असल्याची शाबासकी त्यांनी या वेळी दिली. नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे या दोन्ही संवेदनशील पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आरोग्य चळवळ आम्हा सर्व लोकप्रतिनिधीसाठी आदर्श असून लवकरच कोल्हापूरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने देखील स्वतंत्र मेडिकल विंग तयार करण्याचा मनोदय छत्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

https://twitter.com/thelokshakti/status/1303582835882618880?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *