मोदींच्या भ्याडपणामुळे चीनने आपली जमीन बळकावली – राहूल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

| नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘ट्विट’हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत मोदींच्या भ्याडपणामुळे चीननं भारताची जमीन घेतल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून ट्विट केलं आहे. “प्रत्येकाला भारतीय लष्कराच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास आहे. फक्त पंतप्रधानांना वगळून. ज्यांच्या भ्याडपणानं चीनला आमची जमीन घेण्याची परवानगी दिली. ज्यांच्या खोटेपणामुळे हे निश्चित होईल की ते हे कायम ठेवतील,” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

लडाख मुद्यावरून शुक्रवारीही राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. “केंद्र सरकार लडाखमधील मुद्यावरून चीनचा सामना करण्यास घाबरत आहे. तिथे घडत असलेल्या घटना या गोष्टीची साक्ष देत आहेत की, चीन स्वतःला तयार करत आहे आणि स्वतःची स्थिती मजबूत बनवत आहे. पंतप्रधानांकडे असलेल्या वैयक्तिक धाडसाच्या अभावामुळे आणि माध्यमांच्या मौनामुळे भारताला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

जूनपासून भारत-चीन सीमावाद चिघळला आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने आल्यानंतर मोठा लष्करी संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षापासून सीमेवर तणाव असून, दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून मोदी सरकारच्या चीनविषयक भूमिकेवर टीका केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *