काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू या नावाने त्यांचे सर्व विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात. गेल्या महिन्यातील संसदेतील भाषणात स्वतः राहुल गांधींनी देखील ते कबूल केले होते. संबंध देशभर पप्पू हा शिक्काचं जणू त्यांच्यावर विरोधकांनी मारला होता. परंतु महाराष्ट्रात मनसेने नवीन पप्पू ला जन्म दिला असून ते दुसरे तिसरे कोण नसून ते आहेत पूर्वाश्रमीचे मनसेचे व सध्याचे भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम..
भाजपा आमदार राम कदम यांना पप्पू म्हणत आणि त्यांच्या विरोधात बॅनर लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. प्रजा फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भाजपाचे आमदार राम कदम यांचे स्थान ३२ वे म्हणजेच शेवटचे आहे. आता राम कदम यांच्याबाबत ही माहिती समजल्यावर मनसे हात साफ करणारच, कारण राम कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. राम कदम जेव्हा मनसेत होते तेव्हा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या कामगिरीत त्यांना शेवटचे ठरवले गेल्याने मनसेने त्यांची खिल्ली उडवली.
घाटकोपर मध्ये प्रत्येक चौका-चौकात त्यांचे खिल्ली उडवत चिमटा काढणारे हे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही संदर्भ देण्यात आला आहे. पप्पू कान्ट डान्स साला| गोविंदा आला रे आला| पप्पू कान्ट डान्स साला| तुमचे अभिनंदन असे खिल्ली उडवून चिमटा काढणारे बॅनर राम कदम यांच्या घरासमोरही देखील लावण्यात आले आहेत.