मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे आणि नचिपन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात – संभाजी ब्रिगेड

| औरंगाबाद | मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली.

मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य घटनेच्या ३४० कलमानुसार ओबीसीसाठी पात्र ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली.

संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणावर आपली भूमिका आणि मागणी असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. हे निवेदन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनाही देणार असल्याची माहिती शिवानंद भानुसे यांनी दिली.

संभाजी ब्रिगेडच्या नेमक्या मागण्या काय?

✓ न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारशी स्वीकारुन त्याआधारे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. आत्ता ओबीसीमध्ये NT, A, B, C, D, VJ, SBC असे वेगवेगळे वर्ग आहेत. तशीच एक सब कॅटेगरी तयार करुन मराठ्यांना आरक्षण द्यावे. त्यानंतर ओबीसींची टक्केवारी वाढवण्यासाठी नचिपन समितीचा अहवाल स्वीकारावा.

✓ मराठवाडा वगळता इतर विभागांमध्ये काही काळ मागे जाऊन पाहिले (आजोबा-पणजोबा) तर कुणबी नोंदी मराठा समाजाच्या सापडतात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने या प्रकारचे दाखले न देण्याची अलिखित घोषणा आणि सूचना दिली आहे. महाराष्ट्र सरकारने हे दाखले द्यावेत.

✓ आरक्षणाच्या दृष्टीने देशभरात अत्यंत महत्त्वाच्या जातनिहाय जनगणना करावी आणि नचिपन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published.