मराठवाडा विकास परिषदेची अजब मागणी ; निजामाचे २६२ कोटी रुपये मराठवाड्याच्या विकासासाठी द्यावेत..!

| औरंगाबाद | मराठवाड्याच्या मंडळींना निजामाने इंग्लंडच्या वेस्ट मिनिस्टर बॅंकेत ठेवलेले ३५ दशलक्ष डाॅलर म्हणजेच २६२ कोटी रुपये हवे आहेत. ह्या रक्कमेवर मराठवाडा जनता विकास परिषदेने हक्क सांगितलाय. हे पैसे आपल्याला मिळावेत ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मली सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर ह्यांना परिषदेने निवेदन पाठवले आहे. मराठवाडा जनता विकास परिषद दिवंगत गोविंदभाई श्राॅफ यांच्याशी संबंधित आहे.

मराठवाडा स्वतंत्र होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या आधी हैदराबादचा निजामाने १ सप्टेंबर १९४८ रोजी तत्कालीन एक दशलक्ष पौंड रक्कम इंग्लंडमधील पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत हबीब इब्राहिम रहमतुल्ला यांना नॅशनल वेस्टमिनिस्टर बँकेत भरण्यास सांगितले होते. आता ही रक्कम ३५ दशलक्ष डॉलर एवढी झाली आहे. या रकमेवरती मराठवाड्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे ही रक्कम मराठवाड्याला मिळवून द्यावी अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

निजामाचे वारसदार मुक्रम जहाॅं आणि मुसाखान जहाॅं यांना ही रक्कम मिळू नये अशी जनता विकास परिषदेने मागणी केली आहे. दुसरीकडे स्वतःला निजामाचे वारस समजणाऱ्या १०३ वारसदारांनी ही ३५ मिलियन डॉलर रक्कम आपल्यालाच मिळावी, अशी मागणी केली आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर सर्व संस्थाने भारताच्या संघराज्यात विलीन झाली. परंतु हैदराबादच्या निजामाला भारतात गेलो तर आपली सत्ता आणि संपत्ती जाईल अशी भीती वाटली. त्यामुळे त्याने १ सप्टेंबर १९४८ रोजी म्हणजे हैदराबाद संस्थान भारतात सामील होण्याच्या तेरा दिवस आधी ही रक्कम ही इंग्लंडच्या वेस्टमिनिस्टर बँकेमध्ये भरली होती. दिर्घकाळ कायदेशीर लढा झाल्यानंतर ही रक्कम भारताला मिळणार असल्यामुळे ही सगळी रक्कम ही मराठवाड्याच्या विकासासाठी द्यावी, अशी मराठवाडा जनता विकास परिषदेचे मागणी आहे.

मराठवाडा हा जुन्या हैदराबाद संस्थानचा मोठा भाग होता. त्यामुळे वेस्टमिनिस्टर बँकेतील या रकमेवर मराठवाड्याचा स्वाभाविकच हक्क पोहोचतो. म्हणून ही रक्कम मराठवाड्याच्या आरोग्य, शिक्षण, रस्ते, रखडलेले सिंचन प्रकल्प अशा विकास कामासाठी उपलब्ध व्हावी अशी भूमिका घेऊन मराठवाडा जनता विकास परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर आदींना पत्रव्यवहार सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *