मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकाराने एकवटले..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी याबाबत पुढाकार घेऊन आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा काढता येईल, याबाबत चर्चा करावी अशी विनंती शिवसेना भाजप सह महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी समाजाच्या वतीने केले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक खासदारांनी पुढे येऊन आपला पाठिंबा पत्र संभाजीराजे यांना भेटून दिले आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा श्रीरंग आप्पा बारणे, खा. हेमंत आप्पा गोडसे, खा. धैर्यशील माने, खा. नवनीतकौर ताई राणा, खा. राहूल शेवाळे, खा. प्रतापराव जाधव, खा. ओमराजे निंबाळकर, खा. डॉ. भारतीताई पवार, खा. हिनाताई गावित, खा. रक्षाताई खडसे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. उन्मेष पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी निवेदन देणार आहोत. सक्रिय पाठिंबा दिलेल्या सर्व खासदारांचे समाजाच्या वतीने, ‘समाजाचा घटक’ या नात्याने मी आभार व्यक्त करतो. आता बऱ्याच खासदारांनी संसदेत आवाज उठवायला सुरुवात केली आहे, त्यांचेही समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणखी ही खासदार येऊन भेटणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यात आणि केंद्रात सर्वांना सोबत घेऊन माझे प्रयत्न सुरूच राहतील, असे यावेळी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *