मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, उदयनराजे आक्रमक..!

| सातारा | सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यातच, भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजाचे आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या’, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली, त्यानंतर उदयनराजेंनी ही प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा,’ असे उदयनराजे म्हणाले.

‘चांगले गूण मिळूनही मराठा समाजातील मुलांना अ‍ॅडमिशन मिळत नाही, पण इतर समाजात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे. यापूर्वीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र तसे झाले नाही,’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *