‘महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया..!

| मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील पोलिसांच्या कारभारावर खरमरीत सवाल करतानाच माध्यमांचाही राज यांनी समाचार घेतला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद बराच गाजला होता. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची त्याला पार्श्वभूमी होती. त्यात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले. त्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आघाडीवर होते. त्याचा थेट उल्लेख टाळत राज ठाकरे यांनी माध्यमांचा समाचार घेतला. ‘महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वत:च स्वत:ला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना जाब का विचारला जात नाहीये?’, असा बोचरा सवालही राज यांनी केला.

राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हाथरसच्या घटनेवर निवेदन जारी केले असून केंद्र सरकारलाही यात लक्ष घालण्याचे आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनाला वठणीवर आणण्याचे आवाहन केले आहे. राज यांनी मोजक्याच पण नेमक्या शब्दांत या घटनेवर आपले म्हणणे मांडले आहे.

‘उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे सारंच मन विषण्ण करणारं आहे पण त्याहून भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हा आहे’, अशा शब्दांत राज यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?, असा सवालच राज यांनी विचारला आहे.

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आज जाणार होते. मात्र त्यांना त्याआधीच रोखण्यात आले. पोलिसांनी राहुल यांना धक्काबुक्की केली त्यात ते खाली पडले. राहुल व प्रियांका गांधी यांना अटकही करण्यात आली. या प्रकारावरही राज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पीडित मुलीच्या घरच्यांना कुणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवले जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?’, अशा प्रश्नांची सरबत्तीच राज यांनी केली.

हाथरसमध्ये जी घटना घडली आहे ती पाशवी आहे. अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचे हे होऊन चालणार नाही. यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणा-या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे, असे परखड मतही राज यांनी नोंदवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *