महाविकास आघाडीतील मंत्री विश्वजीत कदम यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर डागली तोफ..

| सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमधील अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी जयंत पाटलांच्या विरोधात तोफ डागली. महाविकास आघाडीतील पक्षातच फूट पाडणे हे मित्रपक्षाचे कटकारस्थान असल्याचा आरोप केला आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार सदाभाऊ पाटील व बाजार समितीच्या सभापतीसह काही संचालकांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. हे काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे घातक राजकारण असल्याचा आरोप करून विश्‍वजित कदम म्हणाले की, माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनाही जयंत पाटील यांनी प्रवेश देण्याचे निश्‍चित केले होते. परंतु आपण जयश्री पाटील यांची मनधरणी केल्यानेच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला नाही.

जयंत पाटील यांना राष्ट्रवादी जिल्ह्यात भक्कम करण्याचा अधिकार निश्‍चितच आहे, परंतु राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतीलच मित्रपक्षांचे नेते राष्ट्रवादीत आणून पक्ष वाढवणे हे निश्‍चितच अनैतिक आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाला राजकीय रसद पुरवली होती. दरम्यान, आता याप्रकरणी जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात, याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. या मुद्यावरूनही आघाडीत पुन्हा कुरबुर होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे दिसत आहे.

नाहीतर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल :

भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील अनेक नेते जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर भाजपची सांगलीतील ओळख ही जयंत भारतीय जनता पक्ष अशीच आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. काँग्रेसला त्रास देऊ नये, नाहीतर आम्हालाही कठोर राजकीय भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही विश्वजित कदम यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *