योगी सरकार नमले , राहुल – प्रियंका यांच्यासह पाच लोकांना हाथरसला जाण्याची परवानगी..

| मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरण आता प्रचंड तापले आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते. परंतु आता प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांना करोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. परंतु आता प्रशानानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.

हाथरसला जाताना प्रियंका गांधी स्वतः कार चालवत होत्या. तसंच त्यांच्या सोबत राहुल गांधीही आहेत. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा होता. राहुल व प्रियंका गांधी हे हथरसकडे रवाना होताच, उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर फौजफाटा वाढवला होता. तर, विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत, रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं. यमूना एक्स्प्रेस वे वर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही केला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *