राज्यातील दारू दुकाने चालू , जिम बंद; हे दुर्दैव – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्याशिवाय, हळुहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करुन अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत ती क्षेत्रं खुली करायला हवी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीसांनी या पत्रात केली आहे.

‘कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही. तर, त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे’, असा सल्ला फडणवसांनी या पत्रात दिला.

‘आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुदैर्वी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही? खरे तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला. संख्यावृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झाली आहे. महाराष्ट्र हा देश असता तर जगात ६ व्या क्रमांकावर आपण आज आहोत’, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *