राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य….!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा , महाविद्यालये बंद आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा , महाविद्यालयांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे निश्चित केले आहे.

मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. दरवर्षी शाळा १५ जूनला सुरु होतात, या वर्षी शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण, पालक -विदयार्थी यांची प्रत्यक्ष भेट , स्वंयसेवकांच्या माध्यमातून शिक्षण अशा प्रकारे ‘शाळा बंद पण शिक्षण चालू ! ‘ असा उपक्रम शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांमध्ये सुरु आहे. पूर्व प्राथमिक ते १२वी पर्यंत सर्व शाळांमध्ये शिक्षण बंद पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या – टप्प्याने पूर्ववत सूरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना सर्व विभागांमार्फत वेळोवेळी तयार करण्यात येत आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २९ ऑक्टोबर २०२० रोजी परिपत्रक काढून राज्यातील अनुदानित , विनाअनुदानित, शासकीय , निमशासकीय, खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण , ऑफलाईन शिक्षण व दूरस्थ शिक्षण संबंधीत कामकाज करण्यासाठी तात्काळ रुजू व्हावे असे या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सूरक्षाविषयक उपाययोजनांबाबत काही मार्गदर्शक सूचना –

✓ बाहेर गावावरून शाळेत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक वाहनाचा वापर करावा.
✓ सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असाल तर मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे. वारंवार चेहऱ्याला हात लावू नये.
✓ शाळेतील स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुकीकरण करावे व शाळा वर्गखोल्या शालेय परिसर दिवसातून किमान एक वेळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावा .
✓ पालकांच्या लेखी संमतीनेच विदयार्थांना शाळेत प्रवेश द्यावा.
✓ शाळेत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मास्कचा वापर करावा
✓ अध्यापन साहित्य, संगणक , लॅपटॉप, प्रिंटर उपकरणाची ७० टक्के अल्कोहोल वाईप्स ने निर्जंतुकीकरण करावे.
✓ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणी कोविड१९ ने आजारी असल्यास शाळेत येवू नये.
✓ शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी.
✓ शाळा व शालेय परिसरात थुंकीवरील बंदीचे काटेकोरपणे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *