राज्यात धनगर आरक्षण मागणीचे आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे..!

| पुणे / महादेव बंडगर | राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.भिगवण (ता. इंदापूर) येथे धनगर ऐक्य अभियान च्या वतीने धनगर समाजाच्या एस.टी च्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यस्तरीय “संकल्प मेळावा” आयोजित करण्यात आला होता.या परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षणाच्या त्वरित अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले असुन भिगवण येथे झालेल्या राज्यव्यापी धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.

या सभेची सांगता करताना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाणे दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश जाळून करण्यात आली.

या संकल्प मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी अनेकांनी बोलताना आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी फसवल्याची भावना बोलून दाखवली. आणि या व्यवस्थेविषयी संताप व्यक्त केला. त्यामुळे आता आरपारची लढाई लढावी अशी एकमुखाने मागणी केली.

भिगवण येथील सभेचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, आबा बंडगर, अनिल तांबे, नाना बंडगर, महेश शेंडगे, दादा थोरात, वैभव देवकाते ,प्रदीप वाकसे ,अतुल देवकाते आदींनी केले होते. तर डॉ. शशिकांत तरंगे सभेचे निमंत्रक होते.सभेला संपूर्ण राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.धनगर समाज एका झेंड्याखाली आणण्यासाठी इंदापूर तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेतला असुन एकच झेंडा आणि एकच दांडा या उक्तीप्रमाणे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सरकारला जाग आणण्यासाठी सर्वपक्षीय समाज एका छताखाली येऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे डॉ. शशिकांत तरंगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सभेला माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, अहिल्यादेवींचे वंशज राजे भूषणसिंह होळकर,माजी आमदार रामराव वडकुते, भाजपा प्रवक्ते गणेश हक्के, मदनराव देवकाते, सुरेश कांबळे, अर्जुन सलगर, चंद्रकांत देशमुख, अक्षय शिंदे, किशोर मासाळ,अभिकाका देवकाते आदी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते राज्यभरात एका वेळी एकच आंदोलन करण्याचे ठरल्याने शासनाला आंदोलनाची दखल घ्यावी लागेल अन्यथा भविष्यात रस्त्यावरील तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी धनगर नेत्यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रुपनवर, महादेव बंडगर यांनी केले.तर आभार नाना मारकड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *