राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्याचे हे पाप मोदी सरकार करत आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून अद्याप २२ हजार कोटी मिळालेले नाहीत. हे पैसे देणे तर दूरच राहिलं पण उलट कर्ज काढा असं सांगितलं जातंय. राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचं हे पाप मोदी सरकार करतं आहे. हक्काचे पैसे देणं तर दूरच पण राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचं काम केंद्र सरकार करतं आहे. निदान याबाबतीत तरी आम्ही सत्ताधारी पक्ष आणि तुम्ही विरोधी पक्ष असं न करता आपण मराठी मातेची लेकरं आहोत म्हणून महाराष्ट्रासाठी कधीतरी एकवटून केंद्राला आपण जाब विचारणार की नाही? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत केला.

कोरोना संकट हे तोंडी लावण्यासाठी आहे हे ठीक आहे. मात्र वस्तू आणि सेवा कराची मांडणी जर का चुकीची असेल तर यावर चर्चा कोण करणार? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यासाठी त्यांनी दै. लोकसत्ताच्या अग्रलेखाचंही उदाहरण दिलं. आमच्यावर विरोधी पक्ष म्हणून टीका करत आहात ते हरकत नाही मात्र केंद्राला तुम्ही जाब का विचारत नाही? कोरोनाची आपत्ती आहे. त्यात लॉकडाउनचा मार्ग पंतप्रधानांनी देशाला दाखवला. त्यानंतर सांगितलं आत्मनिर्भर व्हा. सगळ्या नाड्या आवळायच्या आणि सांगायचं श्वास घ्या असं हे सांगण्यासारखं आत्मनिर्भर व्हा सांगणं आहे अशीही घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत बोलताना केली. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी हक्काचे २२ हजार कोटी अद्याप मिळालेले नाहीत, ते मिळण्याचा मार्गही दिसत नाही असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला.

संकटाच्या काळात आपण सगळे एकवटणार नसू तर मग कधी एकवटणार? १५ तारखेपासून संकटाचा सामना अधिक आक्रमकपणे करायचा आहे त्या संकटाला आपण सगळ्यांनी मिळून सामोरं जायचं आहे त्यासाठी मला सगळ्यांचं सहकार्य हवं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *