राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर, पारनेरचे देवा झिंजाड देखील सन्मानित..!

| पुणे | महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी, गीतरामायणकार ग. दि माडगूळकर यांच्या १ ऑक्टोबर या जयंतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार आणि गदिमांचे वारसदार कवी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. लवकरच २७ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव समारंभाचे आयोजन करून पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सुरेश कंक आणि पुणे विभाग प्रमुख राजेंद्र वाघ यांनी दिली.

नांदेडचे कवी जगदीश कदम यांना ‘गदिमा काव्यप्रतिभा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह गदिमा साहित्य पुरस्कारासाठी ‘विराणी’ अशोक थोरात (अमरावती), ‘पाऊसपाणी’ साहेबराव ठाणगे ( नवी मुंबई), ‘नामुष्कीचे पिढीजात वर्तमान’ विनायक पवार (पेण, अलिबाग), ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ देवा झिंजाड (ता.पारनेर, अहमदनगर), ‘विठुमाऊली की विठोबा’ गणेश भाकरे(नागपूर), ‘गाव भुईचं गोंदण’ श्रीनिवास मस्के (नांदेड) या कवींच्या काव्यसंग्रहांची दोनशेहून अधिक आलेल्या काव्यसंग्रहांतून निवड करण्यात आली आहे.

गदिमांचे वारसदार कवी म्हणून वर्षा बालगोपाल, रवी कांबळे, स्वप्निल चौधरी, मदन देगावकर, वैशाली मोहिते, निशिकांत गुमास्ते यांचा यथोचित सन्मान २७ व्या राज्यस्तरीय गदिमा महोत्सवात करण्यात येणार आहे. यावेळी पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, “कोरोनाची बिकट परिस्थिती निवळली की लवकरच २७ व्या गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. गदिमांच्या जन्मदिवशी राज्यातील कवींना हे पुरस्कार जाहीर करताना विशेष आनंद होत आहे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *