राज्य शासनाच्या सहभागाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पाढे पाठांतर स्पर्धा.!

| मुंबई | महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ नोव्हेंबर, २०२० रोजी राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन मराठी भाषा व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंगद्वारे दि.३ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे.

मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे.

मंदार नामजोशी म्हणाले,’ पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनादतर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे. जिल्हा पातळी, विभाग पातळी व राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेण्यात येणार असली तरी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाढे पाठांतर स्पर्धा खुली आहे. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे. स्पर्धा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल.

स्पर्धेचे नियोजन :

जिल्हा पातळीवर : विद्यार्थी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडिओ क्लिप मेलवर पाठवतील. जिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांना त्या त्या गटातील इयत्तेचा अंकनाद सेट बक्षीस देण्यात येईल.

राज्य पातळीवर : विभागनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांचे पाढ्यांवर आधारित गणितीय आकडेमोड यावर परीक्षण करण्यात येईल.

✓ प्रवेश ,सहभाग आणि पारितोषिके

जिल्हा पातळी : प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन

राज्य पातळी : प्रत्येक विभागातील पहिल्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यातून प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन. सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक बक्षीस व मानचिन्ह देण्यात येईल.

ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यासाठी दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरुन आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करता येतील. जिल्हा पातळीवर विद्यार्थ्याचा दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडिओ अपलोड करावा लागेल.

बालगट (वयोगट – ४ ते ६) इयत्ता पहिलीसाठी अंक उच्चार १ ते १०० असा स्पर्धेचा विषय आहे. इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरीसाठी १ ते १० पाढे, ११ ते २० पाढे, २१ ते ३० पाढे. इयत्ता चौथी, इयत्ता पाचवीसाठी पावकी, निमकी, इयत्ता सहावी, इयत्ता सातवीसाठी पाऊणकी, सवायकी, इयत्ता आठवी, इयत्ता नववी, इयत्ता दहावीसाठी दीडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असे स्पर्धेचे विषय आहेत. खुल्या गटासाठी पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दीडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे हे स्पर्धेचे विषय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.