रण ‘उल्हास’ चे आणि विजय ‘प्रतिमेचा’..!

काल उल्हासनगर मनपातील स्थायी समितीची अतिशय चुरशीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना समर्थक व भाजपचे बंडखोर नगरसेवक विजय पाटील यांची स्थायी समिती सभापती पदी निवड झाली. संपूर्ण बहुमत भाजपच्या पारड्यात असताना देखील शिवसेनेने चमत्कार घडवून महापौर, उपमहापौर नंतर आता शहराच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेतल्या. या चमत्काराचे किमयागार ठरले ते म्हणजे खासदार डॉ श्रीकांत शिंदे..!

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय पाटील १ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवार जया मखिजा यांचा पराभव केला. भाजपमध्ये असलेल्या विजय पाटील यांना शिवसेनेने थेट उमेदवारी दिल्याने निवडणुकी आधीच भाजप बॅकफूटवर गेली होती. महापौर पद मिळवण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपचा डाव शिवसेनेने ओमी कालानी यांच्या सोबतीने याआधी हाणून पाडला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे ७ आणि भाजपाकडे ९ ही विजयी आकडेवारी असल्यामुळे सुरुवातीला स्थायी समिती सभापती पदावर भाजपच्या जया माखिजा यांचा विजय होणार, हे निश्चितच होते; मात्र शिवसेनेने भाजपचेच विजय पाटील यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीला कलाटणी दिली. त्यामुळे ८-८ सदस्यांचे बळ दोन्हीकडे झाले. समसमान ८ मतदान झाल्याने नशिबाचा खेळ चिठ्ठीवर होणार असे चित्र असतानाच भाजपचे स्थायी सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजप संख्याबळा अभावी बॅकफूटला गेली. नाथानी यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी ८ व भाजपा ७ असे संख्याबळ झाल्याने शिवसेनेच्या विजय पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी प्रभावशाली यंत्रणा हाताळली आणि भाजपच्या हातातून आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात हिसकावून घेतल्या. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप मध्ये अंतर्गत दुफळी निर्माण झाली असल्याचे हे द्योतक आहे.

शिवसेनेने आपली घौडदौड या निमित्ताने देखील कायम ठेवली आहे. सत्ता कायम ठेवण्याचा खरा वारसा जपण्याचे काम खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले आहे, हे अजिबात नाकारता येणार नाही. पित्याप्रमाणे अफाट कष्ट घेण्याची क्षमता आणि बेरजेचे राजकारण यांमुळे ही घोडदौड कायम राहील, हे सातत्याने खासदारांनी दाखवून दिले आहे. विकासकामांचा धडाका, नागरिकांमधील अभ्यासू नी कार्यतत्पर छबी, नागरिकांसाठी असणारी सहज उपलब्धता यामुळे मतदारसंघावरील पकड तर त्यांनी मजबूत केलीच आहे, त्या सोबत संघटने अंतर्गत देखील सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्याच गोष्टींचा परिपाक म्हणजे कालचा विजय.!

एकंदरीत राजकीय वर्तुळात या विजयाने अनेक विरोधकांना स्पष्ट संकेत गेले असल्याचे बोलले जात आहे. युवा नेता आपल्या सोबतच्या ज्येष्ठांना घेऊन सत्तेची गणिते सोडवताना पाहून भविष्यातील वाटचालीची स्पष्टता भव्य असेल हे सांगायला कोणी राजकीय ज्योतिषाची गरज पडेल असे वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *