राम कदमांचा नवा स्टंट, महाराष्ट्राच्या राज्यपालांना पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पत्र..!

| मुंबई | पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे राज्यातील नेतेही ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत आहे. याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.

राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे. यावेळी राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते. “पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी,” असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

त्याआधी राम कदम यांच्या नेतृत्वात खारमध्ये ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील नागरिकदेखील होते. काळे झेंडे दाखवून ममता बॅनर्जी सरकारचा निषेध करण्यात आला. नागरिकांकडून यावेळी ‘ममता हटाव बंगाल बचाव” अशा घोषणा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *