रिलायन्स जिओ देशात घडवणार ५ जी ची क्रांती; संपूर्ण नेटवर्क ,हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे. परंतु अजून आपल्याला खुप मोठा पल्ला गाठायचा असल्याचं सांगत करोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमादरम्यान दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी देशात ५ जी सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा केली.

रिलायन्स जिओ २०२१ या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मक रित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले.

“२०२१ या वर्षात रिलायन्स जिओ देशात ५ जी ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत,” असंही अंबानी म्हणाले.

सरकारला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत. देशातील ५ जी सेवांच्या बदलांमध्ये जिओ पुढाकार घेईल. आपण सेमी कन्डक्टरसाठी केवळ आयातीच्या भरवशावर राहू शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. “देशात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २जी सेवा वापरणारे ग्राहक आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत. असं असलं तरीही आझ ३० कोटी ग्राहक २ जी फोनचाच वापर करत आहेत,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.

दूरसंचार क्षेत्राची मदत – पंतप्रधान

“आज देशात आणि जगावर मोबाईनं मोठा प्रभाव टाकला आहे. दहा वर्षांपूर्वी त्याचा अंदाज वर्तवणंही कठीण होतं. शेती, आरोग्य विभाग, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये याद्वारे सामान्य लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येऊ शकतो यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे,” असंही मोदी म्हणाले. करोना काळात दूरसंचार क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडली. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला, डॉक्टरांना रुग्णांची मदत करता आली आणि सरकारचं म्हणणंही लोकांपर्यंत पोहोचवता आलं. केंद्र सरकारचं नवं धोरणं दूरसंचार क्षेत्राला पुढे नेणार आहे आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासही मदत करणार असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

“आज कोट्यवधी लोकांकडे मोबाईल आहेत. प्रत्येकाची आपली डिजिटल ओळख आहे. यामुळे सरकारला सामान्यांपर्यंत मदत पोहोचवणं सहजरित्या शक्य झालं आहे. आज ग्रामीण भागांमध्येही डिजिटली अॅक्टिव्ह लोकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज अब्जाबधींमध्ये कॅशलेश ट्रान्झॅक्शन्स केली जात आहे. आपल्याला आपल्या देशआतील दूरसंचार क्षेत्राला ग्लोबल हब बनवायला हवं,” असंही मोदी यावेळी म्हणाले. आपल्य़ाला आता पुढे जालं लागणार आहे आणि देशात ५ ची स्वप्नही पूर्ण करावं लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *