आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन २०२० सालचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपळवाडी , ता राहुरी जि. अहमदनगर येथे कार्यरात आहेत . चला तर मग सरांशी होऊन जावू दे गप्पा…
✓ प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : सर , कालच राष्ट्रपती पुरस्कारांची घोषणा झाली ; या सालचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार आपणास घोषित झाला. सर्वप्रथम याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल ?
नारायण सर : हे सगळं स्वप्नवत वाटतंय , आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय असा , आनंदाचा असा हा क्षण आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या ,कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मी करत आलेल्या प्रयत्नांना आलेलं हे एक गोड फळ आहे , माझ्या आतापर्यंतच्या तिन्ही शाळा मधील विद्यार्थी , सहकारी , पालक ,ग्रामस्थ , अधिकारी ,पदाधिकारी , आई वडील , कुटुंब आणि माझा कृतीशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM या परिवाराचा हा सन्मान आहे . माझ्या सर्व मित्रांचा , महाराष्ट्राचा , जिल्हापरिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा हा सन्मान आहे.
✓ प्रविण : आपण ज्ञानदानाचे काम कधीपासून करत आहात ?
नारायण सर : माझ्या सेवेची सुरवात तशी जुलै २००३ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ७४ जळगांव या गावातून झाली असली तरी त्याही पूर्वी मी रयत शिक्षण संस्थेच्या कोळपेवाडी , कोपरगाव येथील छत्रपती संभाजी महाराज प्राथमिक विद्यालयात ७ महिने काम केलं. जिल्हा परिषदेत पैठण येथील ७४ जळगाव येथे ९ वर्षे आणि त्यानंतर प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून पैठण तालुक्यातच रहाटगांव येथे ५ वर्षे कार्यरत होतो , त्यानंतर २०१७ साली अंतरजिल्हा बदली ने अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात चेडगांव ग्रामपंचायत अंतर्गत गोपाळवाडी शाळेत माझी बदली झाली. गेल्या ३ वर्षांपासून मी याच शाळेवर कार्यरत आहे.
✓ प्रविण : आपल्या शाळेबद्दल थोडक्यात काय सांगाल ?
नारायण सर : राहुरी – शिंगणापूर हायवे वर ब्राम्हणी गावापासून आत मध्ये वसलेल्या एका छोट्याशा कष्टकरी अशा बहुसंख्य गोपाळ समाजाची वस्ती असणाऱ्या गोपाळवाडी येथे आमच्या शाळेची स्थापना १ डिसेंम्बर १९६१ ला झाली. द्विशिक्षकी असली तरी उपक्रमशील आणि डिजिटल शाळा म्हणून आज पंचक्रोशीत ओळखली जाते. विद्यार्थ्यांना फक्त गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ग्रामीण भागात असतानाही संधी मिळाव्यात यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. अध्ययन अध्यापनात आवश्यक तिथे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत , आनंददायी शिक्षणाचे नवनवीन प्रयोग करणारी , एक प्रयोगशील जिल्हा परिषद शाळा म्हणून आमच्या शाळेने नावलौकिक मिळवला आहे. जिल्हा परिषदेची लोकल शाळा असली तरी आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून शाळेने ग्लोबल भरारी मारली आहे.
✓ प्रविण : आपण आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी यशस्वीपणे घेतलेले उपक्रम आमच्याशी शेयर कराल काय ?
नारायण सर : कुठलीही गोष्ट थेट शिकवण्यापेक्षा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत गेली की ती त्यांच्या चांगली समजते हे लक्षात घेऊन आम्ही शाळेत नियमित उपक्रम राबवत असतो. प्राथमिक शाळांमध्ये उद्याचे सुजाण नागरिक घडतातयेत या विचाराने त्यांच्या सर्वांगीण आणि चौफेर विकासाच्या दृष्टीने उपक्रमांचे आयोजन केले जाते. अध्ययन अध्यापनात आम्ही कला समेकीत शिक्षण म्हणजे कलेच्या माध्यमातून शिक्षण ही अभिनव संकल्पना राबवली, त्यात विविध कला प्रकारांचा अध्ययन अध्यापनात वापर केला. नाटयीकरणं, बाहुलीनाट्य , मुखवट्यांचा वापर , फिंगर पपेट , स्टिक पपेट , संगीत , गीत नृत्य, चित्रकला यांच्या माध्यमातून पाठ्यघटक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मायक्रोसॉफ्टच्या स्कायप इन द कॅलससरूम या टूल च्या साहाय्याने आम्ही जगभरातील २५ देशातील २०० पेक्षा अधिक शाळा आणि शिक्षकांशी संवाद साधला. आमच्या विद्यार्थ्यांना।इंग्रजी बोलण्याची व ऐकण्याची संधी इथे आम्ही उपलब्ध करून दिली , व्हर्चुअल फिल्ड ट्रिप च्या माध्यमातून देशातील , जगातील वेगवेगळ्या ठिकाणानं भेटी दिल्या माहिती घेतली. माहिती, विचारांची देवाणघेवाण करता करता सांस्कृतिक देवाणघेवाण अंतर्गत दक्षिण कोरिया येथील शाळेबरोबर कल्चरल बॉक्स ( आपल्या देशातील संस्कृतीची झलक दाखवणार ) चे आदानप्रदान केले. अमेरिका, रशिया , युक्रेन येथील विद्यार्थ्यांबरोबर शांततेचा संदेश देणाऱ्या कागदी कबुतरांची देवाणघेवाण केली. पत्रांची देवाणघेवाण केली.
लोकशाही बळकटीकरणासाठी शाळेत विद्यार्थी निवडणुकीचे प्रत्यक्ष आयोजन EVM मशीन या अँप च्या माध्यमातून दरवर्षी करतो , लेखक आपल्या भेटीला उपक्रमासारख्या उपक्रमातून आपल्या पाठ्यपुस्तकातील धड्याचे लेखक, कवी यांच्या व्हर्चुअल मुलाखतींचे आयोजन करतो. अवांतर वाचन व्यक्तिमत्वाला पैलू पडणारे म्हणू शाळेत डॉ ए पी जे अब्दुलकलाम वाचनालय आहे त्या अंतर्गत विद्यार्थी नियमित वाचन करतात. बचतीची सवय लागावी व बँकिंग प्रणाली।समजावी यासाठी शाळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीनेच चालवतो. पोलीस स्टेशन , ग्रामपंचायत ,पोस्ट ऑफिस , बँक , स्थानिक उद्योगांना क्षेत्र भेटी अंतर्गत भेट देऊन जीवन शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि व्यवहार ज्ञान विकसित होण्यासाठी बालआनंद मेळावा , बाजार या सारख्या उपक्रमाचे नियमित आयोजन केले जाते. भारताची सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी सर्वधर्मीय सण उत्सव यांचे देखील शाळेत आयोजन केले जाते , राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिन मोठया उत्साहाने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शाळेत साजरे करतो.
✓ प्रविण : एक ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेची शाळा राष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपले स्थान निर्माण करते तेव्हा नक्कीच एक शिक्षक म्हणून प्रचंड अभिमान वाटतो. परंतु या यशामागे अनेक संकटे ,नानाविध अडचणी लपलेल्या असतात. सर या कार्यात आपणास काही संकटाना सामोरे जावे लागले असणार कृपया याबद्दल आपली प्रतिक्रिया काय..
नारायण सर : आमच्या शाळेच्या विविध उपक्रमांची त्यातही कला समेकीत शिक्षणा अंतर्गत उपक्रमाचा इम्पॅक्ट पाहण्यासाठी गतवर्षी NCERT च्या कला विभाग प्रमुख डॉ पवन सुधीर यांच्या नेतृत्वाखाली एक पथकाने शाळेला तीन दिवस भेट दिली होती. भारतातील केवळ ११ शाळा त्यासाठी त्यांनी निवडल्या होत्या आणि आमची त्यापैकी एक होती याचा आम्हाला मनस्वी आनंद आहेच. हे करत असतांना संकटं म्हणाल तर खुप होती, म्हणाल तर काहीच नव्हती. भौतिक सुविधांचा आभाव -काही प्रमाणात आजही आम्हाला जाणवतो, अर्थात काही प्रमाणातच. दुर्गम परिस्थिती, आर्थिक दृष्ट्या दुर्बलता हीच काय ती आव्हाने आमच्या समोर होती. बाकी पालक , ग्रामस्थांचा प्रचंड विश्वास, पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला नेहमी राहीला आहे.
✓ प्रविण : सर आपले आदर्श कोण आहेत ? ज्यांची प्रेरणा आपणास या यशापर्यंत घेऊन गेली .
नारायण सर : तसे माझे सर्वकालीन आदर्श आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत , त्यांनी मलाच नव्हे तर महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेला आणि सगळ्या जगाला आपल्या कार्य कर्तृत्वाने प्रेरित केलं आहे . आपल्या आदर्शचा वस्तुपाठ निर्माण करून ठेवला आहे. त्यांनतर डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा सुद्धा माझ्यावर खूप प्रभाव आहे. माझे मोठे बंधू रविकुमार हे सुद्धा माझे आदर्श आहेत. शिक्षण क्षेत्रात रवींद्रनाथ टागोर , जे कृष्णमूर्ती आदींनी माझ्यावर प्रभाव टाकला आहे.
✓ प्रविण : राष्ट्रपती पुरस्काराची एकूण प्रक्रिया कशी असते ? याबद्दल आपला काय अनुभव आहे ?
नारायण सर : राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया गेल्या तीन वर्षात बदलली आहे , मानव संसाधन विकास मंत्रालय आता ज्याला शिक्षण मंत्रालय म्हंटल जाणार आहे त्यांच्या वतीने ही समग्र प्रक्रिया राबवली जाते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय आशा तीन चाळणीनंतर या पुरस्करार्थींची निवड केली जाते. त्यासाठी पुरस्कारार्थी शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांच्या विद्यार्थी , समाज व शाळा ( समाज ) बदल घडवण्यासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या अनुषंगाने काही मुद्यांच्या आधारे मूल्यमापन केले जाते, मुलाखती घेतल्या जातात , कामाची पडताळणी केली जाते.
✓ प्रविण : या पुढील आयुष्यात आपण शिक्षण क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टी करू इच्छित आहात ?
नारायण सर : माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा , २१ व्या शतकानुरून त्यांना मार्ग दाखवण्याचा , भारताचा भावी नागरिक सर्व दृष्टीने सुदृढ करण्याचा माझा प्रयत्न असेल. शाळा हे समाज विकासाचा आरास समजून , शाळेत पुरोगामी विकासात्मक बदल करण्याची माझी ईच्छा आहे. भौतिक सुविधांनी परिपुर्ण अशी जिल्हापरिषदेची एक उत्कृष्ट शाळा निर्माण करण्याचे माझे स्वप्न आहे.
✓ प्रविण : सर आपले ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षणाबद्दल काय मत आहे ?
नारायण सर : तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर हि काळाची गरज आहे . आज नाही तर उद्या हा वापर वाढणार होताच , कोविडच्या या संकटाने ही वेळ १० वर्षे आधीच आणली आहे. असे असले तरी तंत्रज्ञान शिक्षकांची जागा कधीही घेऊ शकणार नाही. ऑनलाईन शाळांच्या बाबतीत विशेषतः ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. तरी जिथे शक्य आहे तिथे शिक्षक सर्वव्यापी प्रयत्न करत आहेत , शेवटच्या विद्यार्थ्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. अशा या संकट समयी सुद्धा महाराष्ट्रातील काही उपक्रमशील शिक्षक ऑनलाईन आणि ऑफलाईनच समन्वय साधून काम करत आहेत , मला वाटतं आपण त्यांचा आदर्श घेऊ यात.
✓ प्रविण : आपण आपल्या शिक्षक बांधवांना काय संदेश द्याल ?
नारायण सर : आपल्या वर्गात आपल्या समोर बसलेले चिमुकले हे उद्याचे भावी नागरिक आहेत , आपल्याकडुन त्यांना हजारो आशा , अपेक्षा आहेत . त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी आपण सगळेजण काम करत राहुयात , आपल्यातील जे जे उत्तम आहे , ते ते देत राहुयात …..!
✓ प्रविण : धन्यवाद सर ,आपण लोकसंवाद मध्ये मोकळ्या मनाने गप्पा मारल्या. आपली मुलाखत राज्यातील सर्व शिक्षकांना नक्कीच दिशादर्शक ठरेल ! आपले मनःपूर्वक आभार..
नारायण सर : मनस्वी धन्यवाद व आभार
- लोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?
- लोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची
- लोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..!
- लोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक – श्रीमान नारायण मंगलारम
- लोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु – संदीप पवार सर..!