लिपीक ते थेट उपशिक्षणाधिकारी ; अजुन कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा, शिक्षकांमध्ये संताप..!

| मुंबई | इतिहासात पहिल्यांदाच मुख्य लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापरिक्षक या संवर्गातील ४४ कर्मचाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राज्य शासकीय गट अ व गट ब पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम, २०१५ चा आधार घेत या कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने ५५ जणांच्या पदोन्नतीसाठीची शिफारस केली होती. मात्र यापैकी ११ जणांना परीक्षेतून सूट मिळाली नसल्यानमुळे सामान्य प्रशासन विभागाने त्यांना पदोन्नती मंजूर केली आहे. यामुळे ४४ जणांना पदोन्नती देऊन उपशिक्षणाधिकारी पदावर नियुक्त केले आहे.

या निर्णयामुळे शिक्षक वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रथमच शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व जिल्हा परिषद शाळा प्राथमिक तसेच सर्व मुंबई महानगर पालिका, सर्व विभागीय संचालक कार्यालय या ठिकाणी उपशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला शैक्षणिक कामाचा अनुभव तसेच बीएड ही पदवी प्राप्त असावी असा नियम होता. मात्र २०१५ मध्ये यात शिथीलता आणून पदवीधर उमेदवारांना विशेष परीक्षा घेऊन या पदासाठी नियुक्त करण्यात येत होते.

✓ २० ते २२ वर्ष सतत एका विशिष्ठ पदावर काम केल्यानंतर या पदावर काम करण्यासाठी आवश्यक अशी मानसिकता तयार होते, ती तयार होणे त्या कामाची गरजही असते. उपशिक्षणाधिकारी या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला प्रशासकीय काम करावे लागतेच याचबरोबर शैक्षणिक धोरण तसे शिक्षकांसाठी आवश्यक असे कार्यक्रम आखणे अशा विविध शैक्षणिक कामांची जबाबदारीही पार पाडावी लागत असते. यामुळे या पदावरील व्यक्तीला शैक्षणिक अनुभव असणे आवश्यक आहे.

– वसंत काळपांडे, शिक्षण तज्ञ

✓ शिक्षकांना डावलून महाराष्ट्र शासनाने आणलेला हा आदेश भयंकर आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तिथे असे आवश्यक आहे, त्यामुळे तात्काळ हा निर्णय शासनाने मागे घ्यावा.

– शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

1 Comment

  1. अतिशय घाणेरडे राजकारण चालू आहे सध्या शिक्षण क्षेञामध्ये आणि असेच होत राहीले तर भारत देश कदापी सुधरणार नाही.शिक्षंकाचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे.समाज घडवणाऱ्या व्यक्तीला जर मानाचे स्थान नसेल तर काय उपयोग…..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *