लिपुलेख सीमारेषेवर चीनकडून सैन्याची जमवाजमव…?

| लिपुलेख / रोहित कानेटकर | भारतासोबत सीमावादावर शांतता आणि चर्चेतून प्रश्न सोडवता येईल अशी भूमिका चीनकडून घेतली जात असताना दुसरीकडे नेपाळनेही भारतासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, जमिनीवरील परिस्थिती अतिशय वेगळी असल्याचे समोर आले आहे. नेपाळ आणि चीनच्या भूमिकेवर प्रश्व निर्माण झाले आहेत. चीनने आता लिपुलेख भागात क्षेपणास्त्र तैनातीची तयारी सुरू केली असल्याचे समोर आले आहे.

लिपुलेख सीमा भागावरून नेपाळ आणि भारतात वाद सुरू झाला आहे. लिपुलेखचा काही भाग भारताकडे आहे. तर, नेपाळकडे याचा काही भाग आहे. मानसरोवरला जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी हा अतिशय जवळचा मार्ग आहे. या लिपुलेख भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. ओपनसोर्स इंटेलिजेन्सने सॅटेलाइट छायाचित्रे जारी केली असून लिपुलेख भागात चिनी सैन्याच्या हालचाली दिसत आहेत. लिपुलेखजवळ ट्राय-जंक्शन भागात चीनने सैन्य तैनात केले आहेत. त्याशिवाय क्षेपणास्त्रे तैनात करण्यासाठी बांधकाम सुरू केले आहे. या भागातील १०० किमी स्कॅनिंगमुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचालींची माहिती मिळत आहे. जमिनीतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रे हे मानसरोवर तलावाजवळ येत असल्याचे म्हटले जात आहे.

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांनुसार, चिनी सैन्याकडून या भागात मे २०२० पासून पायाभूत सुविधा आणि दीर्घकाळ राहण्यासाठीच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली आहे. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. चीनने लिपुलेखमध्ये जवळपास एक हजार जवान तैनात केले आहेत.

भारताने आपल्या हद्दीत मानसरोवर यात्रेला जाणा-या भाविकांसाठी रस्ता तयार केला आहे. भारताने तयार केलेल्या ८० किमी मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला. त्यानंतर नेपाळने आपला नवीन नकाशा प्रसिद्ध करून लिपुलेख, कालापानी आदी भागांवर दावा केला आहे.

दुसरीकजे चिनी सैन्य पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्याआधी चीनकडून या भागात विजेच्या ताराही टाकण्याचे काम करण्यात आल्याची चर्चा होती. लडाख आणि अक्साई चीन भागातून चिनी सैन्य काही प्रमाणात मागे गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *