लवकरच किल्ले विजयदुर्गचे काम सुरू होईल – खासदार संभाजीराजे

| पुणे | इतिहासात अजिंक्य राहिलेला गड अशी ख्याती असलेल्या विजयदुर्गच्या तटबंदीचे काम लवकरात लवकर सुरू होईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. पावसामुळे गडाच्या तटबंदीचा काही भाग कोसळल्यामुळे गडाच्या जतन-संवर्धनाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी राज्यभरातील दुर्गप्रेमींकडून केली जात होती. सोशल मीडियावर त्यासाठी अभियानही राबवण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी संबंधित विभागाला आदेशित देखील केले आहे.

‘मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. काल पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली. त्याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या आहेत. लवकरात लवकर किल्ले विजयदुगार्चे काम सुरू होईल,’ असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. मराठी इतिहासात अजिंक्य राहिलेला विजयदुर्ग वर्तमानात मात्र उपेक्षित आहे. इंग्रज आणि पोतुर्गीजांनाही धडा शिकविणा-या मराठी आरमाराचा पराक्रम या गडाच्या साक्षीने अधिक बहरला. त्यामुळे गडाचा इतिहास अधिक ठळकपणे प्रकाशझोतात यावा, अशी दुर्गप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांची अपेक्षा आहे.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आहे. अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे विजयदुर्गची भिंत कोसळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *