लवकरच धुराळा उडणार, ग्रामपंचायत निवडणूकांसाठीचा कार्यक्रम जाहीर..!

| पुणे | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून रखडलेली ग्रामपंचायतींची प्रभाग रचना येत्या २७ ऑक्‍टोबरपर्यंत अंतिम करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला. त्यामुळे ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होऊ शकणार आहे.

कोरोनामुळे पंचवार्षिक निवडणुकांना स्थगिती मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वर्षअखेरीपर्यंत (३१ डिसेंबरपर्यंत) किंवा नव्या वर्षात (जानेवारी २०२१) मध्ये होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या वृत्ताला जिल्हाधिकारी कार्यालयानेही दुजोरा दिला आहे.

मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. यानुसार १ जानेवारी २०२० या तारखेपर्यंतच्या मतदार याद्यांच्या आधारे गावनिहाय ग्रामपंचायतींची प्रभाग रचना निर्मिती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने, 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू जाहीर केला. परिणामी ही प्रक्रिया थांबविली होती.

कोरोनामुळे निवडणूक स्थगित झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती केली आहे. त्यामुळे बऱ्याच ग्रामपंचायतींचे कामकाज प्रशासक पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *