विकणे आहेच्या मालिकेनंतर आता मोदी सरकारची नवी मालिका ‘ बंद करणे ‘ , या सरकारी कंपन्या होणार बंद..!

| नवी दिल्ली | माहिती अधिकारातून समोर आलेली माहितीनुसार मोदी सरकार काही कंपन्यांमधील हिस्सा विकून त्यांचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत होते. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. २० केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे. तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे.

यात स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे. नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं २०१६ पासून ३४ कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे. यापैकी ८ कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य ६ कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे. याव्यतिरिक्त २० कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.

प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड, इंजिनियरिंग प्रोजेक्ट (इंडिया) लिमिटेड, ब्रिज अँड रूफ को इंडिया लिमिटेड, यूनिट्स ऑफ सीमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूवर्स लिमिटेड, फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड, नागरनार स्टील प्लांट ऑफ एनडीएमसी या कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याव्यतिरिक्त एलॉय स्टील प्लांट दुर्गापूर, सलेम स्टील प्लांट, सेलचे भद्रावती युनिट, पवन हंस, एअर इंडिया आणि त्यांच्या पाच कंपन्या आणि संयुक्त उपक्रमाचाही निर्गुतवणूक प्रक्रियेत समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *