| विकासाच्या गोष्टी| खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लोकग्राम पुल, चिखलोली स्थानक प्रकल्पांना गती, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत दिल्या सूचना..!

| ठाणे | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती आली असून अस्तित्वातील जुना पुल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येऊन लगेचच नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. जुना पुल पाडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून हे काम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची खा. डॉ. शिंदे यांची सूचना मध्य रेल्वेने मान्य केली असून त्यामुळे जुन्या पुलाचे पाडकाम पूर्ण होताच नव्या बांधकामाला सुरुवात करता येणार आहे. याखेरीज ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात आले असून वेळापत्रकानुसार जून २०२१ मध्ये या मार्गिका प्रवाशांचा सेवेत दाखल होतील. तसेच, चिखलोली येथील नव्या रेल्वे स्थानकासाठीच्या जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमवेत खा. डॉ. शिंदे यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. ठाण्यापुढील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध प्रकल्पांसाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असून या प्रकल्पांच्या पूर्ततेत कुठलीही दिरंगाई करू नका, अशी सूचना खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. ठाणे व दिवादरम्यान पाचवी व सहावी मार्गिका, चिखलोली रेल्वे स्थानक, कल्याण येथील लोकग्राम पुल, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, कळवा व ऐरोली दरम्यान एलिव्हेटेड रेल लिंक, कोपर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म अशा विविध प्रकल्पांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. लोकग्राम येथील पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होऊन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. हे पाडकाम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवा, जेणेकरून पाडकाम पूर्ण होताच नव्या बांधकामाला सुरुवात करता येईल, ही आपली सूचना रेल्वेने मान्य केली असून या पुलासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे लवकरच रेल्वेकडे ७८ कोटी रुपये जमा केले जातील, असेही खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले.

अंबरनाथ व बदलापूर या स्थानकांदरम्यान चिखलोली रेल्वे स्थानकाला खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वेने मंजुरी दिली होती. हे कामही लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असून दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याच प्रयत्नाने या स्थानकासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. आता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली असून काही अडचणी येत असल्याची माहिती बैठकीत रेल्वेने दिली असता या अडचणी सोडवण्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने एक बैठक घेण्याचे आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिले.

ठाण्याच्या पुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाचव्या व सहाव्या मार्गिकांचे कामही प्रगतिपथावर असून वेळापत्रकानुसार जून २०२१ मध्ये या मार्गिकांवरून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. पारसिक येथून खाडीच्या दिशेने जाणाऱ्या एलिव्हेटेड मार्गिकांचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले असून महत्त्वाच्या गर्डरचे लाँचिंग पुढील महिन्यात होणार असल्याची माहिती खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीनंतर दिली. या मार्गिका प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर ठाण्यापुढील प्रवाशांसाठी किमान ५० ज्यादा फेऱ्या सुरू करता येतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

कोपर आणि अंबरनाथ स्थानकांमधील होम प्लॅटफॉर्मचे कामही प्रगतिपथावर असून कोपर येथील काम ३१ मार्च २०२१ पर्यंत, तर अंबरनाथ येथील काम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.