वाचा : काय आहे ऑगस्ट क्रांती दिन..!

देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला ‘भारत छोडो’ असे नाव देण्यात आले होते. ‘करो या मरो’ अशी या आंदोलनाची घोषणा होती.

८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर, ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ९ ऑगस्ट हा दिन क्रांती दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा फडकावत या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले आहे. भारतीयांना पुकारलेला १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता.

दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी, इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे वचन दिले होते. मात्र, ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. त्यामुळे, ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर, इंग्रजांनी गांधींजींना पुण्यातील आगा खाँ तुरुंगात कैद केले. तसेच, स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी, तरुण कार्यकर्ता अरुणा असिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र, गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे, असे आवाहन देशवासियांना केले होते. तरीही, देशातील अनेक भागात हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर, या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली-सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *