व्यक्तिवेध : आठवणीतले विलासराव..!

१.

आयुष्यात “श्रद्धा” आणि “श्रबुरी” महत्वाची : स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

जवळपास ११ वर्षांपूर्वी, २००९ साली मार्च-एप्रिल महिन्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या समवेत लोकसभा निवडणुकांच्या काळात स्टार माझा ( सध्याचे ABP माझा ) वृत्तवाहिनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून ” एक दिवस, एक नेता ” कार्यक्रम करण्याची संधी संपादक राजीव खांडेकर सर यांनी दिली होती. माझे वरिष्ठ सहकारी निलेश खरे सर यांनी यावेळी काही महत्वाच्या नेत्यांसोबत तू कार्यक्रम कर, भरपूर शिकायला मिळेल, अनुभव येईल असे सांगत तुझ्या आवडत्या स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत तू कार्यक्रम कर असे सांगितले..

आदरणीय स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या झंझावाती प्रचारसभा त्यावेळी मी अनुभवल्या.. खरं तर मुख्यमंत्री म्हणून २००९ साली निवडणुकांना सामोर जाण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती. पण नियतीला ते मान्य नव्हते. २६/११ च्या हल्ल्यानंतर ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले होते.. परंतु तरीही विदर्भ, मराठवाडा सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तूफानी प्रचार सभा घेत होते. काँग्रेस पक्षासाठी सतत.. अविरत आणि अविश्रांत… झटत होते… एका दिवसात जवळपास ६ ते ७ प्रचारसभा घेत होते… घसा बसलेला असताना स्व.विलासराव वारंवार कंठ सुधारक वटीखात भाषणं देत होते…

आमचे चार्टेड फ्लाइट नागपुर मधून टेक ऑफ करण्याच्या अगोदर.. साहेबांना एक फोन आला… बहुतेक समोरच्या व्यक्तीला साहेबांचा आवाज नीट ऐकू जात नसावा… तेव्हा साहेब पुन्हा म्हणाले.. बोला, बोला… ” मी विलास देशमुखच बोलतोय”…मला थोडेसे विचित्र वाटत होते… कारण जेव्हापासून राजकारण समजू लागले तेव्हापासून कायम “विलासराव देशमुख “असेच नाव एकत आलो होतो… न राहवून मी साहेबाना विचारले साहेब “आपण फोनवर स्वतःला संबोधित करताना विलास देशमुख असे म्हणालात… ऐकायला थोड़े विचित्र वाटले… कारण आम्ही आजपर्यंत फ़क्त विलासराव देशमुख असेच एकत लहानाचे मोठे झालो..”
त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते.
“मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो.. तो दुसऱ्यांनी द्यायला हवा…आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा..”

आज गल्ली तले “राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार ” ही विशेषण लावणारे पुढारी कुठे….आणि विलासराव देशमुख साहेब कुठे…??

अजुन एक गोष्ट त्यांनी मला प्रवासात सांगितली.. साहेब नेहमी म्हणायचे.. आयुष्यात दोन गोष्टी खुप महत्वाच्या..
” श्रद्धा “आणि ” श्रबुरी”.. ही शिर्डीच्या साईं बाबांची शिकवण….जीवनात संयम खुप महत्वचा…. पराभावाने खचून जावू नका आणि विजयाने उन्माद येवू देवू नका…

( स्व.देशमुख साहेब “सबुरी”च्या ऐवजी “श्रबुरी” म्हणायचे )

२.

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, त्यामुळे सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख

साधारणतः २००२ साली , मी नववीत असताना माझ्या गावी करमाळा पासून ३० किलोमीटर अंतरावर श्री मकाई सहकारी साखर कारखाना येथे स्व. विलासराव देशमुख साहेब हेलिकॉप्टरने भूमिपूजनच्या की गळीत हंगामच्या कार्यक्रमाला येणार होते अशी माहिती मिळाली होती.. एकाचवेळी २ गोष्टींची इच्छापूर्ती होणार होती, एक म्हणजे स्व.विलासराव देशमुख यांस प्रत्यक्षात पाहणे आणि दुसरे म्हणजे हेलिकॉप्टर पाहणे..
याच मकाई कारखानाचे संस्थापक स्व.दिगंबरजी बागल यांच्या नेतृत्वाखाली सख्खे मोठे बंधू श्री महेश चिवटे यांची श्री मकाई कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून निवड झालेली होती.. घरात वडीलबंधू शिस्तप्रिय असल्याने आणि दरम्यान शाळेत परीक्षा सुरू असल्याने कार्यक्रमाला जाण्याचा हट्ट करणे जवळपास अशक्य होते…

अजूनही लक्ख आठवतंय..त्यादिवशी चाचणी परीक्षा होती..आणि सकाळी ११ वाजता आमच्या महात्मा गांधी शाळेसमोर श्री मकाई कारखाना येथे कार्यक्रम ठिकाणी निघण्याच्या तयारीत असलेला एक कार्यकर्त्यांचा ४०७ टेम्पो उभा होता… मनात घालमेल सुरू झाली, एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला स्व.विलासराव देशमुख साहेब यांस समक्ष पाहण्याची – भेटण्याची तीव्र इच्छा… क्षणात निर्धार केला आणि टेम्पोत बसलो… धुरळा उडवीत टेम्पो भिलरवाडी येथे मकाई कारखाना ठिकाणी पोहोचला…

टेम्पोतून उतरताना पाहिलं, हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होत.. जिथं हेलिकॉप्टर उतरणार होतं, त्या जागेजवळ गेलो… तिथं प्रचंड पोलीस बंदोबस्त होता… हेलिपॅड जवळ येणाऱ्या आम्हा लोकांना पोलीस हुसकावून लावत होते आणि बेभान जनता हुरर… हुररर… करत शिट्ट्या वाजवीत होती..

हेलिकॉप्टर खाली उतरले… प्रचंड धुरळा उडाला… नाका-तोंडात माती गेली… हेलिकॉप्टरच्या पंख्याची गर- गर थांबली तशी धुरळा खाली बसला.. आणि हेलिकॉप्टरमधून गॉगल घातलेलं – अंगावर जॅकेट चढविलेलं ऐटदार व्यक्तीमत्व बाहेर पडल… ते रुबाबदार म्हणजे अर्थातच स्व.विलासराव देशमुख साहेब यांचंच होत…

हेलिपॅडच्या बाजूला जे बांबूचे वर्तुळाकार सुरक्षा कवच केले होते त्या ठिकाणहून जनता स्व. विलासरावाना हात दाखवत होते… हाका मारत होते.. साहेब देखील हसतमुखाने सर्वांना हात उंचावून प्रतिसाद देत होते… स्व.दिगंबर बागल यांनी स्व.विलासराव देशमुख यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.. आणि अलिशान गाड्यांचा ताफा स्टेजच्या ठिकाणी निघून गेला…

स्व.विलासराव देशमुख साहेबांना जवळून पाहता यावे यासाठी गर्दीतून वाट काढत स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला… पण काही शक्य झाले नाही… थोड्याच वेळात स्व.विलासराव देशमुख इतर मान्यवरांच्या सहित स्टेज वर दाखल झाले… मी दूर असलो तरी स्व.विलासरावांना नजरेत भरण्याचा प्रयत्न करत होतो… साहेब भाषणाला उभे राहिले आणि पब्लिक मध्ये शिट्ट्या, टाळ्या आणि एकच गदारोळ सुरू झाला… एवढ्या लहान वयात मला राजकीय परिपक्वता नव्हती, त्यामुळे स्व.विलासराव यांनी केलेल्या शाब्दिक कोट्या आणि नेमके कुणाला कोपरखळी मारली आठवत नाही… परंतू पब्लिकने साहेबांचे भाषण डोक्यावर घेतले होते… जवळपास १५ – २० मिनिटे फक्त हशा – टाळ्या आणि शिट्या सुरू होत्या…मध्येच पब्लिक मधून कुणीतरी ईव…ईव…ईव…आवाज काढत स्व.विलासराव देशमुख साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद देत होत…

स्व.देशमुख साहेबांच भाषण संपणाच्या दिशेने सुरू असतानाच स्टेजच्या डावीकडील एक घोळका उठला आणि संरक्षण D box च्या शेजारी धावू लागला… स्व.देशमुख साहेब यांस जवळून भेटण्याची सर्वांनाच इच्छा होती… मला हा अंदाज आल्याने मी देखील या घोळक्याचे दिशेने निघालो… आपल्या चाहत्यांना नाराज करतील ते विलासराव कसे…?? भाषण संपल्यावर स्व.देशमुख साहेब तडक व्यासपीठावरून खाली आले आणि आणि सर्वांशी हस्तांदोलन करायला सुरूवात केली.. स्व. विलासराव यांच्या हातात हात दिलेल्या लोकांचा आनंद अवर्णनीय होता.. पण , या भाऊगर्दीत सहभागी झालेला मी निराश झालो होतो… कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं… स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला… स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं… मी आकाशाकडेच पाहत राहिलो… हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता…. स्व.विलासराव देशमुख साहेब यांची माझी झालेली ही दूरवरूनची का होईना पण पहिली भेट…

एक दिवस – एक नेता या कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत हेलिकॉप्टर मधून आणि चार्टर विमानातून फिरण्याची संधी मिळली. एक खूप मोठ्या मनाचा माणूस आणि संवेदनशील राजकारणी अनुभवता आला.

स्व.विलासराव देशमुख साहेब यांची हेलिकॉप्टरमध्ये मुलाखत घेऊन झाल्यानंतर त्यांना माझ्या पहिल्या भेटीचा हा किस्सा वजा माझा निर्धार सांगितला.. आणि स्व.देशमुख साहेब यांनी मनापासून दाद दिली… आणि एकच वाक्य म्हणाले , आयुष्यात आपण जसा विचार करतो, तशा गोष्टी घडतात… त्यामुळें नेहमी सकारात्मक विचार करा..

सोबतच, नववीत असताना एवढया लहान वयात राजकारण – समाजकारणची कशी आवड होती? असा प्रश्न स्व. विलासरावानी मला विचारला.. मी माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक – नगराध्यक्ष कै मनोहरपंत चिवटे आणि वडील पत्रकार श्री नरसिंह चिवटे यांचा पत्रकारितेचा संदर्भ दिला.. त्यावेळी स्व.देशमुख साहेबांनी मला स्वातंत्र्यसैनिकाचे नातू आहात.. त्यामुळे नावाला आयुष्यभर जपा असा सल्ला दिला…

साहेब.. आपण आज असता तर शुभेच्छा द्यायला नक्कीच आलो असतो…पुण्यतिथी निमित्त हार्दिक अभिवादन…

– मंगेश चिवटे ( लेखक ABP माझाचे Ex. राजकीय पत्रकार असून सध्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख आहेत..!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *