व्यक्तिवेध : जिगरबाज पायलट कॅप्टन दीपक साठे

केरळच्या कोझिकोड विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन दीपक साठे यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दीपक साठे यांनी विमान वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण त्यात यश येऊ शकलं नाही. दीपक साठे यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण काळाने घाला घातला.

मराठमोळे दीपक साठे हे एक जिगरबाज पायलट म्हणून ओळखले जात होते. ते मुंबईतील पवई इथले रहिवासी होते. त्यांचे वडील भारतीय सैन्यात ब्रिगेडियर होते. तर त्यांचा मोठा भाऊ कारगील युद्धात शहीद झाला होता. दीपक साठे यांनीही भारतीय वायुदलात कर्तृत्व गाजवलं आहे. साठे कुटुंबाने आपले आयुष्य देशसेवेसाठीच वेचले.

कॅप्टन दीपक साठे हे एक निपुण पायलट होते. ते वायुसेनेचे माजी पायलट होते. त्यांना प्रचंड मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर वायुसेनेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा Sword of Honor या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना प्रेसिडेंट गोल्ड मेडेल अर्थात राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरवलं होतं.

भारतीय वायुसेनेतील नोकरीनंतर दीपक साठे एअर इंडियात रुजू झाले. वायुसेनेत त्यांची कुशल लढाऊ वैमानिक म्हणून ख्याती होती. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांना एअर इंडियात महत्त्वाची जबाबदारी मिळाली होती. ते ५८ वर्षांचे होते.

कॅप्टन दीपक साठे यांनी विमान वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांनी दोन वेळा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात विमानाचा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साचले होते. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांचे प्राण वाचवता वाचवता दीपक साठे यांनी स्वत:चं बलिदान दिलं.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर कॅप्टन दीपक साठे यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भारताने या दुर्घटनेत एका कुशल वैमानिकाला गमवल्याने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या देशप्रेमी परिवाराला सलाम तर कॅप्टन दीपक साठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *