व्यक्तिवेध : ठाण्यातील आपल्या राहत्या घरात ३०० हून अधिक झाडे लावणारा ट्री मॅन, विजयकुमार कुट्टी..!

आजपर्यंत आपण अनेक वृक्षप्रेमी पाहिले असतील. ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावून आपलं वृक्ष प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र ठाण्यात एक अवलिया असे आहेत ज्यांनी आपल्या बेडरूममध्ये आपल्या आवडत्या झाडांना जागा दिली आहे. त्यांच्या या छंदामुळे ठाण्यातले लोक त्यांना ठाण्याचा ट्री मॅन असे म्हणू लागले आहेत. ते आहेत ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारे विजय कुमार कुट्टी. ते छंद म्हणून घरात झाडे लावत असले तरी ते एक बायोमेडिकल इंजिनियर आहेत. त्यांनी अनेक वर्षे टाटा हॉस्पिटल मध्ये देखील काम केले आहे.

अनेक झाडे त्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या पासून वाढवली आहे. विशेष म्हणजे अनेक जण झाड मरून गेले म्हणून ते फेकून देतात, पण विजय कुमार अशीच झाडे घरी आणतात आणि त्यांना पुनर्जीवन देतात.

विजयकुमार यांनी आपल्या घरातच सुंदर बाग तयार केली आहे. त्यांच्या बेडरूममध्ये तब्बल २७५ प्रकारची विविध झाडे त्यांनी लावली आहेत. तर त्यांच्या घराला असलेल्या बाल्कनीमध्ये एक किचन गार्डन तयार करून त्यात देखील ३० ते ४० फळभाज्या पालेभाज्या त्यांनी वाढवल्या आहेत.

अठरा महिन्यांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा एक झाड आणले होते. मात्र काही कारणास्तव ते झाड जगू शकले नाही. त्यामुळे त्यांची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी झाडांबद्दल माहिती गोळा करत ती माहिती प्रत्यक्षात अमलात आणून घरच्या घरीच अनेक झाडं लावली. विजय कुमार यांना आता कोणत्या झाडाला किती माती लागते, कोणत्या झाडाला किती पाणी लागते, कोणते झाड कोणत्या परिस्थितीत जगू शकते अशा सर्व विषयांची माहिती आहे. तसेच झाडे जगवण्यासाठी जापनीज तंत्रज्ञानाचा वापर देखील ते आता करू शकतात. त्याचप्रमाणे घरात झाडे लावायची असतील तर त्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यांना ओळखणारे लोक आता ठाण्याचे ट्रीमॅन म्हणून त्यांना बोलू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.