
| ठाणे | ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रोच्या भिवंडी आणि कल्याण मधील मार्गाचे फेरनियोजन करण्याच्या स्थानिकांच्या मागणीनुसार तसेच या मार्गाचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर, एमएमआरडीएने या विस्तारित मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (डीएमआरसी) नियुक्ती केली आहे. त्यानुसार, राजीव गांधी चौक ते टेमघर व्हाया वंजारपट्टी नाका आणि दुर्गाडी चौक ते उल्हासनगर व्हाया खडकपाडा व शहाड या दोन मार्गांच्या व्यवहार्यतेवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन शिक्कामोर्तब करणार आहे, अशी माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली.
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो क्र. ५ चे काम ठाणे ते भिवंडी फेज १ आणि भिवंडी ते कल्याण फेज २ असे दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यापैकी फेज १चे काम सुरू झाले असून भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याच्या आरेखनाबाबत असंख्य तक्रारी होत्या. भिवंडी तसेच कल्याण या दोन्ही शहरांमधून जाणाऱ्या या मार्गाचे आरेखन बदलण्याच्या मागण्या सातत्याने होत होत्या. भिवंडीतून जाणारा मार्ग वंजारपट्टी नाक्याला वळसा घालून नेण्याची मागणी भिवंडीतून होत होती, तर कल्याणमधील मार्ग दुर्गाडी चौकातून थेट एपीएमसीला नेण्याऐवजी बिर्ला कॉलेजमार्गे नेण्याची मागणी कल्याणमधील विशेषतः शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करत होते. तसेच, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लावून धरली होती. या सर्व मागण्यांची दखल घेऊन नगरविकासमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीएला भिवंडी व कल्याणमधून जाणाऱ्या मार्गात बदल करण्याबरोबरच उल्हासनगरपर्यंत या मार्गाचा विस्तार करण्याची चाचपणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, एमएमआरडीएने नव्या मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी डीएमआरसीची नियुक्ती मे महिन्यात केली होती. डीएमआरसीने राजीव गांधी चौक ते टेमघर व्हाया वंजारपट्टी नाका आणि दुर्गाडी चौक ते उल्हासनगर व्हाया खडकपाडा व शहाड या दोन मार्गांचा डीपीआर तयार करून एमएमआरडीएला सादर केले. त्यानुसार आता हे दोन मार्ग स्वतंत्र मेट्रो मार्ग म्हणून विकसित करायचे की, मेट्रो मार्ग क्र. ५ चा भाग म्हणूनच त्यात अन्य बदल करायचे याचा तुलनात्मक अभ्यास करून सर्वाधिक व्यवहार्य पर्यायावर शिक्कामोर्तब करण्याची जबाबदारी एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनवर सोपवली असून डीएमआरसी सुचवेल तो पर्याय निश्चित करून त्याचा अंतिम डीपीआर तयार करण्यात येणार आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!