विरोधक असणाऱ्या चीन मध्ये या भारतीय डॉक्टरची जयंती झाली साजरी..!

| मुंबई | सध्या पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. पण डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीच्या निमित्ताने चिनी संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या ऑनलाइन कार्यक्रमात भारतीय आणि चिनी विद्यापीठातील विद्यार्थी एकत्र सहभागी झाले होते. चीन आणि जपानमध्ये १९३८ साली युद्ध झाले. त्यावेळी चीनच्या जखमी सैनिकांवर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरांमध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस होते.

१९३८ साली जखमी चिनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी भारतातील पाच डॉक्टरांचे पथक चीनला रवाना झाले होते. त्यात डॉक्टर एम. अटल, एम. चोळकर, द्वारकानाथ कोटणीस, बी.के.बासू आणि डी. मुखर्जी होते. या पाच डॉक्टरांपैकी द्वारकानाथ कोटणीस वगळता सर्व डॉक्टर मायदेशी परतले.

दुसऱ्या देशांसोबत मैत्री संबंध ठेवणाऱ्या चिनी पीपल्स असोशिएशनने शनिवारी डॉ. कोटणीस यांच्या ११० व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. कोटणीस यांच्यावर आधारीत माहितीपट दाखवण्यात आला तसेच कोटणीस यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा करण्यात आली. लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमावादामुळे सध्या भारत-चीनमधील द्विपक्षीय संबंध अत्यंत खराब स्थितीमध्ये आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला.

भारतातून दून विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चीनमधील वेगवेगळी विद्यापीठे या कार्यक्रमात सहभागी झाली होती. नवी दिल्लीतील चिनी दूतावासातील वरिष्ठ राजनैतिक अधिकारी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *