आदिवासी दिन ९ ऑगस्ट
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो… याविषयी…!
पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोरसारखे अजस्त्र जीव खगोलीय घटनांमुळे नाम:शेष झाले. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करुन गेला आणि नंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळवून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली असली तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रुढी- परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरुन आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रुढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसते.
जगात समाज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास झाला. १९ व्या शतकात दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून २४ ऑक्टोबर १९४५ या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला.
संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या १९२ इतकी आहे, ते एकत्र आले. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल ५० वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली.
जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामध्ये एकूण २२ भाग, १२ अनुसूची व ३९५ अनुच्छेद आहेत. यामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत. अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मुख्य अनुच्छेदामध्ये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.
• अनुच्छेद ३६६ मध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा नमूद केलेली आहे.
• अनुच्छेद ३४२ मध्ये संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात राहत असलेल्या अनुसूचित जमातीची यादी घोषित करण्यात आली आहे.
• अनुच्छेद ३४१ (१)मध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासनासंबंधी व त्याचे नियंत्रण यासंबंधी तरतुदी आहेत.
• अनुच्छेद २४४ (१) ५ मध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असलेल्या कायद्यासंबंधी स्पष्ट तरतूदी आहेत. अर्थात भूमि अधिग्रहण व हस्तांतरण, बँकीग व्यवस्था, प्रशासन व्यवस्था इत्यादी प्रशासकीय बाबी गैर आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त आहेत.
• अनुच्छेद २४४ (१) अंतर्गत ७३ व्या घटना दुरुस्तीद्वारे पाचवी अनुसूची अंतर्गत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींनी आदिवासींची सांस्कृतिक सामाजिक स्वायत्तता जतन करणारा पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी जारी करुन अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार बहाल केला आहे. शासकीय यंत्रणा, निर्वाचित सदस्य आणि आदिवासी यांच्या सहयोगाने या कायद्याच्या अंमलबजावणीतून आदिवासींच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो.
आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजाच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा परंपरा याचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्रातील १२;जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्यांतर्गत सामाजिक हित, रुढी परंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास, तसेच सामुहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपआपसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही इतके पंचायत राज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण यामध्ये सरपंच पदाचे आरक्षणसुद्धा अंतर्भूत आहे.
जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी/गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन, इत्यादी तरतूदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत.
अनुच्छेद १४ मध्ये समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. यासाठी अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९लागू करण्यात आलेला आहे.
अनुच्छेद १६(४) अनुसूचित जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. अनुच्छेद २३ मध्ये मानवी व्यापार व जबरदस्ती काम करवून घेणे याविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी विशेष तरतूद आहे. अनुच्छेद ३३० मध्ये विधानसभेत व ३३२ मध्ये लोकसभेत अनु.जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहूल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करुन हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. राज्यात गडचिरोली, नंदूरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वेकरुन आदिवासी बहूल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतीगृहे उपलब्ध करुन दिली जात आहेत. केवळ इतके करुन होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरु झाले आहे.
याठिकाणी आदीम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र यात दळण-वळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदीम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे, यात माडिया -गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी-माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल. याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या रुढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.
कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करुन इथं आता विकासवाटेवर वाटचाल सुरु झाली आहे, असेच या दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणता येईल.
– प्रशांत अनंतराव दैठणकर
- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य