मुंबई: नातू हवा म्हणून सूनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी विद्या चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी मुलगी झाल्याने छळ करण्यात येत होता, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हे सर्व आरोप विद्या चव्हाण यांनी फेटाळले असले तरी यावरून राजकारण मात्र तापले आहे.
भाजपने यावरून थेट राष्ट्रवादी तसेच काँग्रेसवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे तसेच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रश्न विचारण्यात आला आहे. सूनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?, असं ट्विट करण्यात आलं आहे. त्याचवेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी तर विद्या चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तसेच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मात्र विद्या चव्हाण यांची बाजू जोरकसपणे मांडली आहे. विद्या चव्हाण यांचे कुटुंब सुशिक्षित आहे. त्यांच्याकडून असा कोणताही प्रकार होणार नाही. केवळ राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सगळं केलं जात असून न्यायालयात सत्य समोर येईल, असे चाकणकर म्हणाल्या. तर तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘विद्या चव्हाण गेली ३० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महिलांवरील अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध त्या सातत्याने आवाज उठवत असतात. त्यामुळे त्या सूनेचा अशाप्रकारे छळ करतील यावर माझा विश्वास नाही.’