विशेष लेख : बकरी ईद – त्यागाचे प्रतिक

मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमाजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. बकरी ईदचा इतिहास काय? या दिवशी कुर्बानी का दिली जाते? जाणून घेऊया…
​त्यागाची ईद

ईद-उल-जुहाचे पर्व हिजरीच्या अंतिम महिन्यात जुल हिज्जमध्ये साजरा केले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव मक्कामध्ये (साउदी अरब) एकत्र येऊन हज साजरी करतात. ईद-उल-जुहाचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे. बकरी ईद साजरी करण्यामागे इतिहास आणि काही मान्यता आहेत.


​सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान :
इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले, असे मानले जाते. इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता. त्यांना वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळात पुत्रप्राप्ती झाली होती. मात्र, अल्लाहचा आदेश मानून ते त्यांचा मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले होते. अल्लाहच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत नाही. इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बान देण्यासाठी त्याला घेऊन निघाले होते, तेव्हा रस्त्यात त्यांची एका व्यक्तीशी भेट झाली.

​वचनाची आठवण :
रस्त्यात भेटलेला इसम त्यांना म्हणाला की, आता या वयात तुम्ही तुमच्या मुलाला का कुर्बान करायला निघाला आहात? त्याचे म्हणणे ऐकल्यावर त्यांचे मनही डगमगू लागले आणि ते विचारात पडले. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी अल्लाहला वचन दिले आहे. मुलाच्या प्रती असलेले प्रेम कुर्बानी देताना आड येऊ नये, म्हणून त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा हसता-खेळताना दिसला. अल्‍लाहने चमत्‍कार केला आणि मुलाच्या जागी ‘दुंबा’ कुर्बान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि ‘दुंबा’ कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते.


​सैतानाला मारतात दगड :
हज यात्रेला जाणारे मुस्लिम बांधव इब्राहिमला रस्ता चुकविण्यास सहाय्यभूत ठरलेल्या इसमाला सैतान समजून त्याला आपल्या हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी दगड मारतात. कुर्बान केलेल्या बकऱ्याचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियाच्या घरात किंवा गरजूंना देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. बकरी ईदनंतर एक महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहरम साजरा करण्यात येतो.

शब्दश: अर्थ :
वास्तविक पाहता अरबी भाषेत ‘बकर’ शब्दाचा अर्थ मोठे जनावर ज्याला कापले जाते, असा आहे. त्याचेच स्वरुप म्हणजे ‘बकरा ईद’. भारतासह बकरी ईद पाकिस्तान आणि बांग्लादेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *