विशेष लेख : रक्षाबंधन – परंपरा, आख्यायिका..!

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एखादा तरी सण आहे. यातील एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या भावाने आपले सदैव रक्षण करावे म्हणून बहिण याच दिवशी आपल्या भावाला राखी बांधते. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल || ही प्रार्थना प्रत्येक बहिण राखी बांधताना आपल्या भावाला करत असते. श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते आणि हीच राखी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर बांधते. बहीण-भावाचे नाते दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो

काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. यामागे एकच उद्देश आहे, राखी बांधणारा समोरच्याचे सुख, समृद्धी, यश, पराक्रम चिंतीत असतो त्याबदल्यात त्याने फक्त आपले रक्षण करावे एवढी माफक अपेक्षा त्याची असते.

काही आख्यायिका :

• पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली.

• पूर्वी इंद्र आणि दैत्यांच्या युद्धात 12 दिवसानंतर इंद्र थकला. दैत्य इंद्रावर हावी होत होते यावेळी इंद्राची पत्नी शुचीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. याच दोऱ्याच्या प्रभावाने युद्धात इंद्राचा विजय झाला. तेव्हापासून एखाद्याचे रक्षण करण्यासाठी दोरा बांधण्याची प्रथा रूढ झाली.

• महाभारतात श्री कृष्णाच्या बोटाला जखम होऊन वाहणारे रक्त थांबवण्यासाठी द्रौपदीने आपले पितांबर फाडून त्याची चिंधी बांधली. त्यावेळेपासून कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा पण केला.

• पौराणिक कथांनुसार, राखीच्या उत्सवाची सुरुवात ही मृत्यू देवता यम आणि त्याची बहीण यमुना यांच्यातील रक्षाबंधनाने झाले असे मानले जाते. यमुनेने आपला भाऊ यमाला राखी बांधली. यमाने यमुनाला अमरत्वाचे वरदान दिले. पुढे यमाने असेही सांगितले होती की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेईल त्याची आजीवन सुरक्षा होईल.

• चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी पाठवली होती. त्या राखीचा मान राखून हुमायूनेही जीवाची बाजी लावून तिचे रक्षण केले होते.

अशाप्रकारे पुराणकाळापासून रक्षाबंधन हा सण साजरा होत असल्याचे दिसत आहे.

शनीच्या क्रूर दृष्टीसोबत त्याची बहिण भद्रा हिचा प्रभावही हानीकारक असतो. रावणाने भद्राकाळात शूर्पणखेकडून राखी बांधून घेतली आणि त्याच वर्षी त्याचा त्याच्या कुळासहित नाश झाला. म्हणून भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये असे सांगितले जाते. राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते.

आजकाल समाजामध्ये स्त्रियांवर होत असलेले अत्याचार पाहता प्रत्येक स्त्रीमागे एका भावाने उभे राहण्याची गरज आहे. भलेही समोरची स्त्री आपली बहिण नसो मात्र ती कोणाचीतरी बहिण आहे असा विचार करून तिचे रक्षण करायला हवे.

दरम्यान, मात्र एक असं गाव आहे जिथे तब्बल ५० वर्षांपासून बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधलेली नाही. भीखमपूर जगतपुरवा असं या गावाचं नाव असून ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. या गावात रक्षाबंधनाचा उल्लेखही केला जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील जगतपुरवा येथे 20 घरे अशी आहेत, ज्या घरांमधील जवळपास 200 मुले, तरुण आणि वृद्ध रक्षाबंधनाचे नाव काढले तरी घाबरून जातात. स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच दशकांपासून येथे बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधलेली नाही. या गावातून आसपासच्या गावात गेलेले तरूण जेव्हा आपल्या गावाचे नाव सांगतात ते ऐकूनच आजुबाजूच्या मुली या तरुणांना राखी बांधण्यासाठी पुढे येत नाहीत. गावकऱ्यांनी याबाबत म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यावेळी बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली आहे, तेव्हा गावात काहीना काही अघटीत घटना घडली, त्यामुळे आजतागायत तिथे हा सण साजरा केला जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *