व्यक्तिवेध : आपला माणूस..! श्री.संतोष परशुराम शिंदे (भाऊ) !! एक अवलिया..!

शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे आपल्या अतुलनीय लोकाभिमुख नेतृत्वाने गारूड करणारं व्यक्तीमत्त्व म्हणजे श्री.संतोषभाऊ शिंदे !

सामान्य शिवसैनिक ते शिवसेना ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख (ग्रा.) हा राजकीय प्रवास भाऊंच्या भरीव आणि प्रभावी अशा समाजाभिमुख कामाची साक्ष देणारा आहे. शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि मुशीत तयार झालेल्या या शिवसैनिकाने सदैव समाजकारणाचा वसा निष्ठेने चालविला. वडील आदरणीय श्री.परशुराम शिंदे यांच्या मार्गदर्शनात भाऊंनी आपले कर्तृत्व सिद्ध करीत सामान्य जनांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.

शहापूर शहरप्रमुख असतांना शहापूर शहरातील जनसामान्यांच्या मदतीला तत्पर असणारा, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून भाऊंनी आपल्या कर्तृत्वाने आगळी ओळख निर्माण केली. शहापूर तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या सोडविणारा , त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार असा’ आपला माणूस ‘ म्हणून संपूर्ण शहापूर तालुका वासियांचा गळयातील ताईत बनला !!

सदैव विविध अभिनव उपक्रम राबविण्यात हातखंडा असलेले कल्पक नेतृत्व म्हणून संतोषभाऊ ओळखले जातात. त्यांचे हे उपक्रम समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना उपयुक्त आणि लाभदायी असतात.मग ते सान असो की थोर , तरुण असोत की वृद्ध, महिला भगिनी , जेष्ठ नागरिक आदी सर्व नागरिकांना भाऊंचे उपक्रम भूरळ घालतात. हटके आणि अभिनव लोकोपयोगी उपक्रमांची सदैव रेलचेल असते.म्हणूनच भाऊंना उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजर म्हणून ओळखले जाते.

बाल आनंद मेळावा, महिला दिन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद महोत्सव, महिला भगिनींसाठी देवदर्शन यात्रा, तरूण ऊर्जेला विधायक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा भव्य कबड्डी स्पर्धा चषक, शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप, मराठी संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या गुढीपाडवा उत्सव, आदी उपक्रम भाऊंच्या समाजाभिमुखतेची साक्ष देणारे असेच आहेत. अशा उपक्रमांची यादी खरं तर न संपणारी अशीच !

मुंबई नजीक वसलेला शहापूर तालुका . जवळपास दीड कोटी मुंबईकरांची तहान भागवणारा तालुका येथील धरणे मुंंबापुरीचे जलस्त्रोत परंतु शहापूर तालुक्यातील जनता आणि शेती मात्र सदैव तहानलेली. गोरगरिबांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर ची पायपीट पाचवीला पूजलेली. राज्याच्या राजधानीची तहान भागवणारा तालुका मात्र सदा तहानलेला हा येथील जनतेवरचा घोर अन्याय संतोष भाऊंसारख्या संवेदनशील मनाच्या नेत्याला स्वस्थ बसून देत नव्हता . म्हणून भाऊंनी शहापूर ते मंत्रालय अशी भव्य जलदिंडी काढली. तालुक्यातील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. या विराट जलदिंडी ने सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधले आणि तालुका दुष्काळ मुक्त होण्यासाठी पहिले पाऊल पडले.

संतोष भाऊ हे हाडाचे शिवसैनिक . जनसेवा हेच आद्यकर्तव्य या भावनेतून ते रात्रंदिवस जनतेसाठी कार्यरत असतात. दरवर्षी बालदिनी भव्य अशा बाल आनंद मेळावा साजरा केला जातो.बालगोपाळांना या फूल टू धमाल कार्यक्रमाची ओढ लागलेली असते. तसेच दरवर्षी छोट्या बालखेळाडूंसाठी क्रिकेट साहित्य कीटचे वाटप भाऊंच्या वतीने करण्यात येते.

समाजातील गोरगरीब गरजू बंधूभगिनिंसाठी संतोष भाऊ म्हणजे एक पाठीराखा ! आधारस्तंभच !! भाऊ या बांधवांच्या गरजेला सतत धावून जात असतात . आधार देतात. गोरगरीब विधवा महिलांसाठी मदत असो की सफाई कामगारांच्या विविध समस्या. भाऊंचे सहकार्य मोलाचे असते.

वयस्क तथा चिरतरूण जेष्ठ नागरिकांसाठी एक दिवस धमाल आनंदोत्सव साजरा करणारे भाऊ या वृद्धांना कमालीचा आनंद देणारा सखाच ! त्याचप्रमाणे शेकडो महिला भगिनींना तीर्थयात्रा घडवून आणण्याचे काम करणारे संतोष भाऊ म्हणजे एक बंधूतूल्य नेतृत्व !

तरूणाईसाठी तर भाऊ जणू गळ्यतील ताईतच ! तरूणांसाठी रोजगार असो की क्रिडा स्पर्धा आदी उपक्रमांतून या युवाऊर्जेसाठी विधायक दिशादर्शक काम करणारे संतोष भाऊ तरूणांना नेहमीच भावणारे ! मराठी मातीतला मर्दानी खेळ असलेल्या कबड्डी च्या अभूतपूर्व अशा भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन संतोष भाऊंनी केले. शहापूर आणि परिसरातील युवा खेळाडूंसाठी ती एक पर्धणीच ठरली. असे अनेक उपक्रम राबवून संतोष भाऊ आपल्या विधायक समाजकारणाचा यज्ञ सदैव तेवत ठेवत असतात.

संतोषभाऊंना त्यांच्या या व्यस्त समाजकारणात मोलाचे सहकार्य आणि खंबीर साथ लाभते ते त्यांची अर्धांगिनी सौ.रजनी वहिनींचे. रजनी वहिनी शहापूर नगरपंचायतच्या नगरसेविका झाल्यानंतर भाऊंच्या समाजकारणात लोकसेवेच्या माध्यमातून वहिनींची बहुमोल साथ लाभते. अलीकडेच वहिनींची नगराध्यक्षा म्हणून एकमताने निवड झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभाशिर्वादाने आणि नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात भाऊंच्या साथीने शहापूर नगरपंचायतचा कारभार अतिशय उत्कृष्टरित्या चालवत आहेत.

समाजकारणाचा पिंड असलेल्या भाऊ आणि वहिनींनी नगरपंचायतच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती दिली आहे. अनेक कामे मार्गी लावत शहापूरनगरीला विकासाच्या दिशेने गतीमान केले आहे.

दरम्यानच्या काळात कोरोना आपत्ती आली आणि लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.अशा बिकट परिस्थितीत संतोष भाऊंनी कंबर कसली.सामान्य जनतेच्या मदतीला धावून जात विविध उपाययोजना केल्या. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, नियमांचे काटेकोर पालन, घ्यावयाची काळजी आदी बाबींसंदर्भात जनजागृती केली. साहित्य वाटप केले. हातावरचे पोट असलेल्या गोरगरीब गरजू बांधवांसाठी रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली असतांना जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.सुरेशजी म्हात्रे यांच्या सहकार्याने तालुक्यातील ३००० कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप केले.

त्याचप्रमाणे शहरातील गोरगरीब बांधवांसाठी सौ.रजनीवहिनींच्या साथीने नगराध्यक्षा अन्नछत्राचे आयोजन केले.त्याअंतर्गत लॉकडाऊन कालावधीत ३५ दिवस नियमितपणे ३५००० गरजू बांधवांना अन्नवाटप केले. त्याचप्रमाणे शहापूर शहर व परिसरातील गरजू बांधवांना किराणा साहित्याचे वाटप केले.

या आणि अशा अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रमांतून भाऊंची सामान्य जनतेची सेवा अविरत सुरू असते. आपल्या या अतुलनीय कर्तृत्वाने भाऊंनी जनसामान्यांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.म्हणूनच संतोष शिंदे हे केवळ एक नेता नसून जनसामान्यांचा “आपला माणूस” आहे. सखा आहे. भाऊ आहे. ही भावना जनमानसात , मनामनात आहे.

अशा या कर्मवीर लोकनेत्याचा श्री.संतोष भाऊंचा आज वाढदिवस..! आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

– विजय उदार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *